युक्रेनची भूमी शत्रूला देण्याचा तोडगा अमान्य : झेलेन्स्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 10:32 IST2025-08-10T10:31:58+5:302025-08-10T10:32:46+5:30
रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी शिखर बैठक

युक्रेनची भूमी शत्रूला देण्याचा तोडगा अमान्य : झेलेन्स्की
कीव्ह : युक्रेनला आपली जमीन सोडून द्यायला सांगणारा कुठलाही तोडगा आम्ही मान्य करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी शनिवारी मांडली.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे पुढील आठवड्यात शुक्रवारी अलास्का येथे भेटणार आहेत. रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी ही शिखर बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी हे वक्तव्य केले आहे. पुतीन हे झेलेन्स्की यांना भेटणार नसतील, तरी आपण पुतीन यांची भेट घेऊ, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे झेलेन्स्की यांना टाळून ट्रम्प-पुतीन भेट होणार असल्याचे दिसून येत आहे.
यासंदर्भात टेलिग्रामवर जारी केलेल्या एका निवेदनात झेलेन्स्की यांनी सांगितले की, युक्रेनला चर्चेत सहभागी करून न घेता केलेला कोणताही शांतता करार निष्फळ ठरेल. संविधानात नमूद असलेली युक्रेनची भौगोलिक अखंडता कधीही चर्चेचा विषय होऊ शकत नाही आणि कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेच्या टेबलावर युक्रेनची उपस्थिती असणे आवश्यक आहे.