जुआन यांच्या ११४ वर्षे दीर्घायुष्याचं रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 11:03 AM2024-04-06T11:03:20+5:302024-04-06T11:04:02+5:30

Maharashtra News: माणसं दीर्घायुषी का होतात? ज्यांना दीर्घायुष्य लाभतं ती माणसं नेमकं काय खातात? कशी राहातात? ती श्रीमंत असतात की गरीब? त्यांच्या या दीर्घ आयुष्याचं रहस्य काय?

The secret of Juan's 114 years of longevity! | जुआन यांच्या ११४ वर्षे दीर्घायुष्याचं रहस्य!

जुआन यांच्या ११४ वर्षे दीर्घायुष्याचं रहस्य!

माणसं दीर्घायुषी का होतात? ज्यांना दीर्घायुष्य लाभतं ती माणसं नेमकं काय खातात? कशी राहातात? ती श्रीमंत असतात की गरीब? त्यांच्या या दीर्घ आयुष्याचं रहस्य काय? - आजपर्यंतचा इतिहास तपासला तर लक्षात येतं, आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्या वयाची शंभरी पूर्ण करून अगदी ११० किंवा त्यापेक्षाही अधिक आयुष्य उपभोगलेलं आहे, त्यातल्या काहींनी तर त्या त्या काळात जगातील सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्ती असा बहुमानही मिळवलेला आहे, ती सारी माणसं अगदी साधी-सुधी, खेड्यापाड्यात राहाणारी अशीच आहेत. निसर्गाच्या सान्निध्यातच त्यांचं सारं आयुष्य गेेलेलं आहे. 

निसर्गाशी एकरुप होताना ते अक्षरश: त्या निसर्गाचाच एक भाग झाले. त्यांचं अन्न, त्यांचं राहाणीमान, त्यांचे कपडे, त्यांचा राहण्याचा परिसर.. या साऱ्या गोष्टींनी निसर्गाशी मेळ घातलेला दिसून येतो. जन्मापासून त्यांनी फक्त काबाडकष्टच केले. गर्भश्रीमंतांची नावं या यादीत दिसत नाहीत. साऱ्या वैद्यकीय सुविधा त्यांच्या हाताशी असल्या, यातल्या काहींनी भरपूर आयुष्य उपभोगलेलं असलं तरी त्यांना ‘जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती’चा मान आतापर्यंत मिळालेला दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य हवं असेल तर तुम्हीही निसर्गाशी एकरूप व्हा, त्याप्रमाणेच आपली लाइफस्टाइल ठेवा आणि आयुष्यभर काबाडकष्ट करा,  असा निष्कर्ष काढता येईल. मुळात जगभरातल्या तज्ज्ञांचंही हेच म्हणणं आहे. 

जगातील सर्वांत वयोवृद्ध पुरुष व्हेनेझुएलाचे जुआन व्हिसेंट पेरेझ मोरा यांचं नुकतंच वयाच्या ११४व्या वर्षी निधन झालं. त्यांच्याबाबतीतही हेच सत्य होतं. निसर्गाच्या सान्निध्यात ते जगले, वाढले आणि निसर्गातच एकरूप झाले! त्यांच्यापेक्षा वयानं बऱ्याच मोठ्या असलेल्या काही महिला मात्र अजूनही आहेत. जगातील सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्ती म्हणून अमेरिकेच्या ब्रायन्स मोरेरा यांचं नाव सध्या गिनेस बुकमध्ये नोंदवलेलं आहे. त्या आता ११७ वर्षांच्या आहेत. असं असलं तरी यासंदर्भात वादही सुरू आहेत आणि ब्राझीलच्या डेओलिरा ग्लिसेरिया पेड्रो डिसिल्वा या आजी जगात सर्वांत वयोवृद्ध आहेत, असा त्यांच्या नातेवाईकांचा दावा आहे. त्यांचं वय सध्या ११९ वर्षे आहे आणि ब्राझील सरकारनंच दिलेला जन्माचा अधिकृत पुरावाही त्यांच्याकडे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. 

यासंदर्भातला निर्णय लागेल तेव्हा लागेल, पण मुख्य मुद्दा म्हणजे जगातली ही साऱ्या ज्येष्ठ मंडळींनी आपल्या जन्मापासून निसर्गाचा हात धरला आणि त्यामुळेच ती ‘मोठी’ झाली! गेल्यावर्षी जगातील सर्वाधिक वयोवृद्ध दक्षिण आफ्रिकेच्या जोहाना माजिबुको आजींचं निधन झालं. त्यांचं वय किती होतं? तब्बल १२८ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. त्याही अशाच खेड्यापाड्यात राहाणाऱ्या होत्या आणि काबाडकष्टांतच त्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं. 

जुआन यांच्या आयुष्याचा धांडोळा घेतला तर काय दिसतं? वयाच्या केवळ पाचव्या वर्षीच त्यांनी वडील आणि अपल्या मोठ्या भावांबरोबर शेतात काम करणं सुरू केलं. ऊस आणि कॉफीच्या मळ्यात त्यांच्याबरोबर तेही राबत होते. मोठे झाल्यावर ते ‘शेरिफ’ (एकप्रकारचे स्थानिक पोलीस पाटील) झाले आणि आपल्या गावातील, परिसरातील जमिनीसंदर्भाचे वाद, अडचणी सोडवायला त्यांनी सुरुवात केली.  

२७ मे १९०९ रोजी त्यांचा जन्म झाला. एकूण दहा भावंडांमध्ये त्यांचा नववा क्रमांक होता. १९३८मध्ये त्यांनी एडिओफिना गार्सिया या महिलेशी लग्न केलं. त्यांना ११ मुलं झाली. त्यांना ४१ नातू, १८ पणतू, तर १२ खापरपणतू आहेत! जुआन यांना प्रेमानं ‘टिओ’ असंही म्हटलं जायचं. 

१८ जानेवारी २०२२ रोजी त्यावेळचे जगातील सर्वांत वयोवृद्ध पुरुष स्पेनचे सॅटर्निनो डे ला फुएंते गार्सिया यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांचं वय ११२ वर्षे ३४१ दिवस होतं. त्यानंतर जुआन यांना हयात असलेला जगातील सर्वांत बुजुर्ग पुरुषाचा मान देण्यात आला. गिनेस बुकमध्ये तशी नोंद करण्यात आली. जुआन यांचं वैशिष्ट्य म्हणजे अखेरपर्यंत आजारपण त्यांना माहीतच नव्हतं. त्यांची स्मृतीही अतिशय तल्लख होती. त्यांच्या आयुष्यातील जवळपास सगळ्या गोष्टी त्यांच्या तोंडपाठ होत्या.

ना कुठला आजार, ना कुठलं औषध! 
जुआन यांना वयोमानानुसार ऐकायला थोडं कमी येत होतं. बाकी त्यांच्या तब्येतीची कधीच तक्रार नव्हती. त्यांचे कुटुंबीय सांगतात, आजारी पडलेलं आम्ही त्यांना कधीच पाहिलेलं नाही. त्यांनी कधी कुठली औषधंही घेतली नाहीत. अगदी अखेरच्या काळातही नाही. त्यांचं खाणंही अतिशय साधं होतं. केक, सूप आणि ॲवोकॅडो.. या गोष्टी मात्र ते अगदी आवडीनं खायचे! परिस्थिती साधी असली, तरी आयुष्यभर त्यांनी दुसऱ्यांना मदत केली, त्यांच्या सुख-दु:खात ते सहभागी झाले. त्यांच्या दृष्टीनं लोकांचं प्रेम हीच त्यांच्यासाठी मोठी संपत्ती होती!

Web Title: The secret of Juan's 114 years of longevity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.