"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 14:55 IST2025-07-23T14:54:24+5:302025-07-23T14:55:22+5:30
महत्वाचे म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू सातत्याने, गाझातील लोकांना शेजारील मुस्लीम देशांत शिफ्ट करण्यात यावे, असे म्हणत आहेत. याशिवाय, दक्षिण गाझातील राफा शहरातही यांना हलवण्याची तयारी आहे.

"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
हमास आणि इस्रायल यांच्यात युद्धविरामासंदर्भात साधारणपणे एक महिन्यापासून चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप कुठलाही मार्ग निघालेला नाही. एवढेच नाही तर, आता इस्रायलने जाहीर केलेल्या खतरनाक इराद्यांमुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे. इस्रायलचे अर्थमंत्री बेजालेल स्मॉट्रिक म्हणाले, उत्तर गाझाचे विलिनीकरण करण्यात येईल. हा भाग इस्रायलला जोडला जाईल. तो गाझा रिव्हिएरा (Gaza Riviera) म्हणून विकसित केला जाईल. हा भाग आम्ही इस्रायलचा एक अविभाज्य भाग बनवू. इजरायली लष्कर प्रमुख इयाल जमिर यांनीही याची पुष्टी केली आहे.
स्मॉट्रिक म्हणाले, "एका कॉन्फ्रन्समध्ये 'द गाझा रिव्हिएरा- विझन टू रियलिटी' विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ते म्हणाले, या भागात ज्यू वस्त्या वसवल्या जातील. याशिवाय, गाझामध्ये राहत असलेल्या पॅलेस्टिनियन नागरिकांना दक्षिणी गाझामध्ये हलवले जाईल. याशिवाय ते इजिप्त, येमेन, लेबनॉन सारख्या मुस्लीम देशांतह जाऊ शकतात. येथे मोठ्या प्रमाणावर शक्यता असल्याचा मला विश्वास आहे. आम्ही या भागाचे विलिनीकरण करणार आणि येथे तीन समुदाय वसवणार. सुरक्षिततेच्या दृष्टीने या भागाचे विलिनीकरण व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे.
खरे तर गाझा रिव्हिएरासारख्या कॉलोनींची चर्चा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याच वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात केली होती. एवढेच नाही तर यासंदर्भात त्यांनी एआयच्या माध्यमाने तयार केलेला एक व्हिडिओदेखील शेअर केला होता. यात, स्वतःल आणि नेतन्याहू यांना त्यांनी बीचवर दर्शवले होते.