भारतीय उच्चायुक्तांना जमावाने गुरुद्वारात जाण्यापासून रोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 08:47 AM2023-10-01T08:47:02+5:302023-10-01T08:47:22+5:30

खलिस्तानी समर्थकांचा घेराव, ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालयाकडे नोंदवला आक्षेप

The Indian High Commissioner was prevented from entering the Gurdwara by the mob | भारतीय उच्चायुक्तांना जमावाने गुरुद्वारात जाण्यापासून रोखले

भारतीय उच्चायुक्तांना जमावाने गुरुद्वारात जाण्यापासून रोखले

googlenewsNext

लंडन : ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना खलिस्तानवाद्यांनी स्कॉटलंडमधील गुरुद्वारात जाण्यास मज्जाव केला. दोराईस्वामी खलिस्तानी कारवायांबाबत गुरुद्वारा समितीची बैठक घेण्यासाठी आले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, भारताने या प्रकरणावर ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालयाकडे आक्षेप नोंदवला आहे.

खलिस्तान समर्थकांनी दोराईस्वामी यांना गुरुद्वाराच्या बाहेर घेराव घालून त्यांना गुरुद्वारात प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्यानंतर दोराईस्वामी गाडीत बसून तेथून निघून गेले. ते निघून जात असतानाही खलिस्तान समर्थक त्यांना तेथे पुन्हा कधीही न येण्याची सूचना करताना व्हिडीओत दिसतात.  सर्व स्तरांतून या घटनेचा निषेध केला जात आहे. (वृत्तसंस्था)

भारत सर्वात सुरक्षित

या घटनेनंतर भाजप नेते मनिंदर सिंह सिरसा म्हणाले, स्कॉटलंडमध्ये जे घडले त्याचा मी निषेध करतो. धर्म हिंसाचार पसरवण्याचे आवाहन करत नाही. पंतप्रधान मोदींनीही आमच्या समुदायाचे कौतुक केले होते. शिखांसाठी भारत हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे.

म्हणे, सरकारचे लोक येऊ शकत नाहीत...

उच्चायुक्तांना अडवणाऱ्या खलिस्तानी समर्थकांपैकी एक जण म्हणाला की, आम्हाला हे कळले होते की, भारतीय राजदूत येथे येणार आहेत. आम्ही त्यांना अडवल्यानंतर ते कारमध्ये बसून परत गेले. भारत सरकारकडून गुरुद्वारात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत तेच होईल.

ते काय करू पाहत आहेत हे आम्हाला माहीत आहे. कॅनडामध्ये काय झाले ते आम्ही पाहिले आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी स्पष्टपणे भारताचा निषेध करून त्याच्या मुत्सद्याची हकालपट्टी केली. अशा परिस्थितीत त्यांना गुरुद्वाराला भेट देण्याचे निमंत्रण देणे अत्यंत  चुकीचे आहे.

Web Title: The Indian High Commissioner was prevented from entering the Gurdwara by the mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.