जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 09:13 IST2025-05-15T08:58:57+5:302025-05-15T09:13:56+5:30
युक्रेनवर हल्ल्यानंतर फिनलँड आणि स्वीडन या देशांनी नाटोचे सदस्यत्व घेतले होते. रशियाचा याला विरोध होता, युक्रेनदेखील हेच करेल व नाटोचे सैन्य रशियाच्या वेशीवर येईल म्हणून रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता.

जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
जगात सध्या दोन ठिकाणी युद्ध सुरु आहेत. भारत-पाकिस्तान युद्ध होता होता राहिले आहे. अशातच युक्रेनसोबत गेले तीन वर्षे लढणाऱ्या रशियन सैन्याने जगातील सर्वात सुखी समजल्या जाणाऱ्या देशाला वेढा घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे युरोपमध्ये खळबळ उडाली आहे.
युक्रेनवर हल्ल्यानंतर फिनलँड आणि स्वीडन या देशांनी नाटोचे सदस्यत्व घेतले होते. रशियाचा याला विरोध होता, युक्रेनदेखील हेच करेल व नाटोचे सैन्य रशियाच्या वेशीवर येईल म्हणून रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. आता रशियाने फिनलँडकडे आपला मोर्चा वळविण्यास सुरुवात केल्याचा दावा स्वीडनने केला आहे.
रशियाने फिनलंडच्या सीमेजवळील चार महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सैन्य आणि लष्करी उपकरणे तैनात केली आहेत. स्वीडनने उपग्रह प्रतिमांवरून रशिया मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे. यामुळे युरोपच्या चिंतेत वाढ झाली आहे. युक्रेन हल्ल्यानंतर रशियाची ही दुसरी कारवाई आहे. स्वीडनच्या राष्ट्रीय प्रसारक एसव्हीटी आणि उपग्रह कंपनी प्लॅनेट लॅब्सने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमधून हे समोर आले आहे.
रशियाने कामेंका, पेट्रोझावोड्स्क, सेवेरोमोर्स्क-२ आणि ओलेन्या या चार ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सैन्याची तैनाती केली आहे. धक्कादायक म्हणजे फेब्रुवारीपासून फिनलँडच्या सीमेपासून ३५ मैल दूर अंतरावर रशियन लष्कराचे तंबू दिसत आहेत. सध्या तिथे २००० पेक्षा जास्त सैनिक असून तिथे शस्त्रास्त्रे तैनातीचे काम सुरु असल्याचे दिसत असल्याचे स्वीडनने म्हटले आहे. तर पेट्रोझावोड्स्कमध्ये तीन मोठे लष्करी गोदाम बांधण्यात आले आहेत, यात प्रत्येकी ५० चिलखती वाहने मावू शकतात. सेव्हेरोमोर्स्क-२ येथे मोठ्या संख्येने हेलिकॉप्टरच्या हालचाली होत आहेत. तर युक्रेनवर हल्ल्याची सुरुवात केलेल्या ओलेन्यामध्ये देखील सैन्याच्या हालचाली वाढू लागल्या असल्याचे यात म्हटले आहे. फिनलंड एप्रिल २०२३ मध्ये आणि स्वीडन मार्च २०२४ मध्ये नाटोमध्ये सामील झाले होते.