गरिबीमुळे अनेक देशांचं अस्तित्व टांगणीवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 09:28 IST2025-01-16T09:27:46+5:302025-01-16T09:28:05+5:30
जगातल्या अत्यंत गरीब पहिल्या दहा देशांमध्ये पहिला क्रमांक लागतो तो दक्षिण सुदानचा. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत पूर्व आफ्रिकेतील बुरुंडी आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक.

गरिबीमुळे अनेक देशांचं अस्तित्व टांगणीवर!
जगात गरीब आणि श्रीमंतांची दरी कायमच राहाणार आहे. जसं माणसांचं, तसंच देशांचं... जगात काही देश अति श्रीमंत, विकसित, तर काही देश अक्षरश: दारिद्र्याच्या खाईत आहेत. खाण्यापिण्यालाही मौताद असणाऱ्या या देशांपुढे त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा आहे. जगाच्या मदतीशिवाय या देशांची अर्थव्यवस्था पुढे चालू शकणार नाही आणि इथले लोकही त्याशिवाय तग धरू शकणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. जगातल्या अत्यंत गरीब पहिल्या दहा देशांमध्ये पहिला क्रमांक लागतो तो दक्षिण सुदानचा. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत पूर्व आफ्रिकेतील बुरुंडी आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक. त्यानंतरचे गरीब देश आहेत अनुक्रमे कांगो, मोझाम्बिक, नायजर, मालावी, लायबेरिया, मादागास्कर आणि येमेन.
दक्षिण सुदान हा जगातला सर्वात युवा देश म्हणून ओळखला जातो. २०११मध्ये सुदानपासून हा देश वेगळा झाला. देशात कायमची राजकीय अस्थिरता आणि पर्यावरणाच्या प्रश्नानं या देशाला घेरलेलं आहे. केवळ एक कोटी लोकसंख्येचा हा देश अनेक प्रश्नांशी आणि आपल्या अस्तित्वाशी झुंजतो आहे. सध्या या देशाचा जीडीपी सुमारे २६ अब्ज डॉलर्स आहे. पूर्व आफ्रिकन बुरुंडी देश पूर्णपणे कृषिव्यवस्थेवर आधारलेला आहे. सततचा दुष्काळ, नापिकी आणि राजकीय अस्थिरता यामुळे हा देश हैराण झाला आहे. यामुळे बहुतांश जनता आज दरिद्री अवस्थेत जगते आहे.
सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक हा देश चारही बाजूंनी जमिनीनं घेरलेला आहे. प्रामुख्यानं नैसर्गिक संसाधनांसाठी हा देश ओळखला जातो, पण देशातील राजकीय संघर्ष आणि तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे देश अराजकाच्या स्थितीत आहे. जवळपास ६० लाख लोकसंख्या असलेल्या या देशाचा जीडीपी सुमारे तीन अब्ज डॉलर्स आहे. सहारा वाळवंटातील उष्णतेनं हैराण झालेल्या कांगो या देशाची जनता प्रचंड आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. या देशातही नैसर्गिक साधनांची रेलचेल आहे, पण सततच्या अशांततेमुळे या देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. गेल्या काही काळापासून गरिबीतून बाहेर पडायलाच तयार नाही. सध्या या देशाचा जीडीपी सुमारे १५.४० अब्ज डॉलर्स इतका आहे.
मोझाम्बिक हा देश नैसर्गिक वायू आणि तेलानं अतिशय समृद्ध आहे. खरंतर यातून या देशाला चांगलं परकीय चलनही प्राप्त होऊ शकतं, पण २०१७मध्ये बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यामुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला. सध्या या देशाचा जीडीपी सुमारे २४ अब्ज डॉलर्स आहे. दक्षिण आफ्रिकेच्या समुद्रकिनाऱ्यावर वसलेला हा देश सध्या विकलांग झालेला आहे. सहारा वाळवंटाच्या उष्णतेचा सामना करणारा नायजर हा दक्षिण आफ्रिकी देश म्हणजे गरिबीचं सर्वात मोठं केंद्र आहे. वाळवंटातील उष्णतेमुळे येथील शेतीवर आधारित अर्थव्यवस्था नेहमीच अडचणीत सापडते. त्यामुळे येथील जनता अत्यंत गरिबीत जगत आहे.
गरीब देशांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेतील मालावी या देशाचाही समावेश होतो. २.१३ कोटी लोकसंख्येचा हा देश त्याच्या सुंदर नैसर्गिक दृश्यांसाठी ओळखला जातो. मात्र सुविधांअभावी पर्यटक येथे येत नाहीत. कृषी आधारित अर्थव्यवस्थेमुळे, या देशाचा जीडीपी सुमारे ११ अब्ज डॉलर्स आहे.