ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 15:43 IST2025-12-23T15:42:32+5:302025-12-23T15:43:16+5:30
दीपूचंद्रने धार्माचा अपमान (ईशनिंदा) केल्याचा आरोप, त्याला मारणाऱ्या धर्मांधांनी केला होता. मात्र, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचे पुरावे मिळालेले नाहीत.

ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
बांगला देशातील मयमनसिंह जिल्ह्यात 27 वर्षीय हिंदू तुरुण दीपूचंद्र दासची धर्मांध सैतानांनी हत्या केल्या प्रकरणात, आता नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. दीपूचंद्रने धार्माचा अपमान (ईशनिंदा) केल्याचा आरोप, त्याला मारणाऱ्या धर्मांधांनी केला होता. मात्र, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचे पुरावे मिळालेले नाहीत. यातच आता दीपूचंद्रच्या कुटुंबानेही धक्कादायक खुलासा केला आहे.
दीपूचंद्रच्या कुटुंबाने म्हटले आहे की, त्याने 'पायनियर निटवियर्स' कंपनीमध्ये प्रमोशनसाठी परीक्षा दिली होती. तो सध्या फ्लोअर मॅनेजर म्हणून कार्यरत होता. जर प्रमोशन झाले असते तर तो सुपरवायझर झाला असता. मात्र काही लोकांना त्याच्या प्रमोशनसंदर्भात आक्षेप होता. यावरूनही वाद होता.
यासंदर्भात बोलताना दीपूचा भाऊ अपू रोबी यांने सांगितले की, या पदोन्नतीवरून त्याचे सहकाऱ्यांशी मतभेद होते. ज्या दिवशी ही घटना घडली, त्याच दिवशी दुपारी त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्याच्यावर धार्मिक भावना भडकावल्याचा (ईशनिंदेचे) खोटा आरोप करण्यात आला. त्याला बेदम मारहाण करत कंपनीबाहेर फेकण्यात आले. दीपूने स्वतःला वाचवण्यासाठी प्रचंड गयावया केली, माफीही मागितली, मात्र जमावाने त्याला सोडले नाही. कुटुंबातील इतर लोक आणि स्थानिक लोकांनीही प्रमोशनसंदर्भातील वादासंदर्भात भाष्य केले आहे.
अपू पुढे म्हणाला, दीपूचा मित्र, हिमेलने त्याला कॉल करत घटनेची माहिती दिली होती. तसेच, जमाव त्याच्या भावाला घेऊन पोलीस स्टेशनकडे जात असल्याचेही सांगितले होते. अपू म्हणाला, माझ्या भावावर पैगंबर मुहम्मदांविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप केला गेला होता. यानंतर मला पुन्हा हिमेलचा फोन आला आणि माझ्या भावाची हत्या जाल्याचे त्याने सांगितले. यानंतर, आपण घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा आपल्या भावाला जिवंत जाळल्याचे दिसून आले."
अद्याप, पोलीस आणि रॅपिड अॅक्शन बटालियनला धार्मिक भावना भडकवल्याचा कसलाही पुरावा मिळालेला नाही. मेयमनसिंह जिल्हायचे एसपी अब्दुल्ला अल मामून म्हणाले, ईशनिंदेच्या आरोपाची पुष्टी झालेली नाही. असे आरोप केवळ जमावाने केले आहेत. यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचे पुरावे मिळालेले नाहीत. तसेच, या दाव्यांच्या सत्यतेसंदर्बात आपल्याला कसल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही.