डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 20:37 IST2025-10-19T20:37:29+5:302025-10-19T20:37:52+5:30
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील हे तिसरे मोठे आंदोलन आहे. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेत सध्या शटडाउन लागले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
वॉश्गिंटन - अमेरिकेत रविवारी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं जन आंदोलन झाले. हे आंदोलन देशातील विविध शहरातील २६०० हून अधिक ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून झाले. त्यात जवळपास ७० लाख लोकांनी सहभाग नोंदवला. या आंदोलनाला नो किंग्स प्रोटेस्ट नाव देण्यात आले होते. ट्रम्प प्रशासन हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
याआधीही जून महिन्यात नो किंग्स आंदोलन २१०० ठिकाणी झाले होते. आज न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वायर, बोस्टन, अटलांटा आणि शिकागो येथे मोठ्या संख्येने जमाव जमला होता. वॉशिंग्टन, लॉस एंजेलिस आणि अनेक रिपब्लिकन शासित अनेक राज्यांमध्येही लोक रस्त्यावर उतरले. रिपब्लिकन पक्षाने या निदर्शनांना "हेट अमेरिका रॅलीज" असे नाव दिले. "नो किंग्ज" या निषेधांना ट्रम्प यांनी एआय-जनरेटेड व्हिडिओद्वारे प्रत्युत्तर दिले. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर २० सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांना मुकुट घातलेल्या लढाऊ विमानाच्या पायलटच्या रूपात दाखवण्यात आले आहे. त्यांच्या जेटवर "किंग ट्रम्प" असे लिहिले होते. व्हिडिओमध्ये ट्रम्प निदर्शकांवर विष्ठा फेकताना दिसत आहेत.
ट्रम्प यांच्या कार्यकाळातील तिसरं मोठं आंदोलन
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील हे तिसरे मोठे आंदोलन आहे. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेत सध्या शटडाउन लागले आहे. अनेक सरकारी सेवा ठप्प आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या कठोर धोरणामुळे संसद आणि न्यायव्यवस्थेशी संघर्ष वाढला आहे. निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांनी लोकशाही, न्याय आणि सत्तेच्या गैरवापराविरुद्ध आवाज उठवला. "या देशात सध्या काय चालले आहे ते मला समजत नाही असं ह्युस्टनमधील माजी यूएस मरीन कॉर्प्स सैनिक डॅनियल गेमेझ यांनी म्हटलं. आंदोलनकर्त्यांनी शांततेत सगळीकडे आंदोलन केले. त्यात कुठलीही अटक झाली नाही. न्यूयॉर्क शहरात १ लाखाहून अधिक लोकांनी आंदोलनात सहभाग घेतला.
BREAKING: Analysts are calling this the biggest protest in American history. It’s far bigger than any rally Donald Trump has ever had. This is Boston. Rallies just like this are happening in cities big and small all around the country. Let’s go. pic.twitter.com/atwBbIUECQ
— Democratic Wins Media (@DemocraticWins) October 18, 2025
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त धोरणांविरुद्ध जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती. स्थलांतरितांच्या हद्दपारी आणि गरिबांसाठी आरोग्य सुविधेत कपात केल्याबद्दल १,६०० हून अधिक ठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. जूनमध्ये पहिल्यांदा नो किंग्स प्रदर्शन झाले होते. त्यावेळी साल्ट लेक सिटी येथे विरोध प्रदर्शन करताना हिंसक वळण लागले. आंदोलनात गोळीबारीचा प्रयत्न झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता.