युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 20:12 IST2026-04-13T20:12:25+5:302026-04-13T20:12:47+5:30
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही इराणविरुद्धची लढाई सुरूच असून सीजफायर कोणत्याही क्षणी संपवू शकतो, असे खळबळजनक विधान केले आहे.

युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
इराण आणि अमेरिका यांच्यातील इस्लामाबाद शांतता चर्चा निष्फळ ठरली आहे. आता पश्चिम आशियात युद्धाचे ढग गडद झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' बंद करण्याचा आदेश दिला असून, १३ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ७:३० वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार) या समुद्री मार्गाची नाकेबंदी सुरू करणार असल्याचे अमेरिकन नौदलाने म्हटले आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही इराणविरुद्धची लढाई सुरूच असून सीजफायर कोणत्याही क्षणी संपवू शकतो, असे खळबळजनक विधान केले आहे.
"शत्रूला सीमेपासून दूर ढकलतोय" -
१२ एप्रिल रोजी लेबनॉन सीमाभागातील सैनिकांची भेट घेतल्यानंतर नेतन्याहू म्हणाले की, "आमचे कमांडर आणि सैन्य शत्रूला सीमेपासून दूर ढकलण्याचे अविश्वसनीय काम करत आहेत. जोपर्यंत इस्रायलच्या सर्व नागरिकांना पूर्ण सुरक्षा मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही." इस्लामाबाद वार्ता फेल होण्याचे कारण सांगताना ते म्हणाले, इराण सातत्याने करारांचे उल्लंघन करत होता, जे अमेरिकेने खपवून घेतले नाही. उपराष्ट्रपती जे. डी. व्हॅन्स यांनी त्यांना या संदर्भातील माहिती दिली आहे.
इराणचाही अमेरिकेला इशारा -
ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला अशा जहाजांना रोखण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यांनी या मार्गावरून जाण्यासाठी इराणला शुल्क दिले आहे. या नाकेबंदीच्या घोषणेनंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर इराणच्या बंदरांना धोका निर्माण झाला, तर पर्शियन खाडी किंवा ओमानच्या खाडीतील एकही बंदर सुरक्षित राहणार नाही, असा थेट इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे.