अमेरिकेच्या संसदेत मोदी-पुतिन यांच्या 'त्या' फोटोवर खळबळ; महिला खासदाराचा ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:14 IST2025-12-11T12:12:43+5:302025-12-11T12:14:26+5:30
डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्याने पोस्टर दाखवत अमेरिकन सरकारला सुनावले; "तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे भारत रशियाच्या जवळ गेला!"

अमेरिकेच्या संसदेत मोदी-पुतिन यांच्या 'त्या' फोटोवर खळबळ; महिला खासदाराचा ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीदरम्यान दिल्लीत काढलेल्या एका फोटोमुळे अमेरिकेच्या संसदेत मोठा वादंग निर्माण झाला आहे. या फोटोचे थेट पोस्टर बनवून ते संसदेत सादर करण्यात आले आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या एका महिला खासदारने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका केली.
हजार शब्दांएवढे मौल्यवान पोस्टर
डेमोक्रॅटिक सदस्य कमलागर-डोव्ह यांनी संसदेत चर्चेदरम्यान मोदी आणि पुतिन यांच्या कारमधील एकत्र बसलेल्या फोटोचे पोस्टर दाखवले. या फोटोचा संदर्भ देत कमलागर-डोव्ह यांनी अमेरिकन सरकारला गंभीर चिंता व्यक्त करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, "या फोटोमुळे अमेरिकन सरकारला चिंता वाटली पाहिजे. सरकारच्या सदोष धोरणांमुळेच पुतिन भारताला भेट देत आहेत आणि त्यांना तिथे पाठिंबा मिळत आहे."
डोव्ह यांनी थेट ट्रम्प प्रशासनावर निशाणा साधला. "भारत हा अमेरिकेचा एक मजबूत सहयोगी भागीदार आहे, परंतु ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे भारत रशियाच्या अधिक जवळ आला आहे. पुतिन यांची अलीकडील भेट याचे उत्तम उदाहरण आहे," असे त्या म्हणाल्या.
ट्रम्प यांच्या नोबेल मोहीमेवर टीका
डोव्ह यांनी ट्रम्प यांच्या नोबेल शांतता पुरस्काराच्या मोहिमेवरही टीका केली. "आपल्या मित्रांना आपल्या शत्रूंच्या हाती सोपवून तुम्ही नोबेल शांतता पुरस्कार जिंकू शकत नाही," असे त्यांनी सुनावले.
प्रोटोकॉल तोडून काढलेला फोटो
४-५ डिसेंबर दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारत दौऱ्यावर आले होते. पुतिन यांचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पालम विमानतळावर जाऊन प्रोटोकॉलही मोडला होता. पालम येथून ७ लोक कल्याण मार्ग, पंतप्रधानांचे निवासस्थान येथे परतत असताना मोदी आणि पुतिन यांनी त्यांच्या कारमध्ये एकत्र फोटो काढला होता.
परराष्ट्र धोरण बदलण्याची मागणी
कमलागर-डोव्ह यांनी ट्रम्प यांना त्यांचे परराष्ट्र धोरण त्वरित बदलण्याचे आवाहन केले. त्यांनी इशारा दिला की, "जर ट्रम्प यांनी त्यांची भूमिका बदलली नाही, तर भारताची मैत्री गमावणारे अमेरिकन अध्यक्ष म्हणून त्यांना इतिहासात लक्षात ठेवले जाईल." इतर सदस्यांनीही ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.