ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 10:55 IST2025-07-27T10:52:43+5:302025-07-27T10:55:19+5:30
Thailand vs Cambodia war: आज पहाटे पुन्हा सीमेवर ऐकू आले तोफांचे आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
Thailand vs Cambodia war:थायलंड आणि कंबोडियामधील सीमा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज संघर्षाचा चौथा दिवस आहे, परंतु दोन्ही देशांच्या सैन्यांमधील चकमकी अद्याप थांबल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धविरामाचे आवाहन करुनही सीमावर्ती भागात जोरदार गोळीबार सुरूच आहे. आज पहाटेपासून सीमेभोवती तोफांचा आवाज ऐकू येऊ लागला, ज्यामुळे सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सीमेवर पुन्हा चकमकी
एएफपीच्या वृत्तानुसार, रविवारी (२७ जुलै २०२५) पहाटे सीमेवर पुन्हा चकमकी सुरू झाल्या. सीमेपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या कंबोडियातील समरोंग शहरातही स्फोटांचे आवाज ऐकू आले. यावरून, दोन्ही देशांच्या सैन्याकडून किती जोरदार गोळीबार केला जात आहे, याचा अंदाज लावता येतो. ही घटना अशा वेळी घडत आहे, जेव्हा दोन्ही देशांमधील युद्धविरामासाठीआंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जाताहेत. मात्र, रविवारच्या गोळीबारामुळे हे स्पष्ट झाले आहे की, तणाव अजूनही कायम आहे.
ट्रम्प यांनी केलेला युद्धविरामाचा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दावा केला होता की,थायलंड आणि कंबोडियाच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर लवकरच दोन्ही देशांमध्ये युद्धविराम होऊ शकतो. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर लिहिले होते की, थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई आणि कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट लवकरच भेटतील आणि युद्ध थांबवण्याच्या दिशेने पावले उचलतील. मात्र, त्यांच्या विधानाच्या काही तासांतच सीमेवर पुन्हा गोळीबार सुरू झाला.
थायलंड आणि कंबोडियामधील वाद काय आहे?
थायलंड आणि कंबोडियामधील हा वाद नवीन नाही. दोन्ही देशांदरम्यान एकूण ८१७ किमी लांबीची सीमा आहे, ज्याच्या अनेक भागांवर वाद सुरू आहेत. विशेषतः ११ व्या शतकातील ऐतिहासिक प्रेह विहार मंदिर, ज्याला २००८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले होते, ते वादाचे केंद्र आहे. हे मंदिर डोंगराळ भागात असून, धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. १९६२ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) हे मंदिर कंबोडियाचा भाग असल्याचे मानले. परंतु थायलंडने हा निर्णय स्वीकारला नाही. तेव्हापासून, हा परिसर दोन्ही देशांमधील तणावाचे कारण बनला आहे.