थायलंडच्या 'मातृतुल्य' पूर्व महाराणी सिरिकिट यांचे निधन, दीर्घकाळ आजाराशी दिली झुंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 11:30 IST2025-10-25T11:28:03+5:302025-10-25T11:30:29+5:30
Thailand Queen Sirikit dies: महाराणी सिरिकिट यांनी राजा अदुल्यादेज यांच्याशी ६६ वर्षे संसार केला.

थायलंडच्या 'मातृतुल्य' पूर्व महाराणी सिरिकिट यांचे निधन, दीर्घकाळ आजाराशी दिली झुंज
Thailand Queen Sirikit dies: थायलंडची माजी राणी सिरिकिट यांचे वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले. सध्याचे राजा वजिरालोंगकोर्न यांच्या त्या आई होत्या, तर थायलंडमध्ये सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राजा भूमिबोल अदुल्यादेज यांच्या त्या पत्नी होत्या. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राणी सिरिकिट यांनी राजा अदुल्यादेज यांच्याशी ६६ वर्षे संसार केला, जो एक मैलाचा दगड मानला जातो. या दीर्घ वैवाहिक जीवनात त्यांनी एका समर्पित पत्नीची भूमिका चोख बजावली. त्याचसोबत थायलंड जनतेसाठी एक मजबूत आणि दयाळू मातृवत्सल प्रतिमाही जपली.
राणी सिरिकिटने फॅशन जगतातही आपले स्थान निर्माण केले होते. त्यांची फॅशनची शैली केवळ थायलंडमध्येच नव्हे तर जगभरात चर्चिली गेली. अनेक पाश्चात्य मासिकांनी मुखपृष्ठावर त्यांचा फोटो वापरला होता. तसेच, काहींनी त्यांची तुलना अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी जॅकी केनेडी यांच्याशी केली. त्यादेखील आपल्या फॅशन शैलीसाठी ओळखल्या जात होत्या.
राणी सिरिकिट यांना कोणता आजार होता?
राजवाड्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवारी संपूर्ण दिवस महाराणीची प्रकृती खालावली होती. रात्री ९ वाजून २१ वाजता त्यांचे निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या आणि चुलालोंगकोर्न रुग्णालयात उपचार घेत होत्या, परंतु त्यांचे प्राण वाचवणे शक्य झाले नाही. निवेदनात असेही म्हटले आहे की राणी सिरिकिट २०१९ पासून रुग्णालयात दाखल होत्या आणि विविध आजारांनी ग्रस्त होत्या. या महिन्यात त्यांना रक्तसंसर्ग देखील झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली. महाराणी सिरिकिट यांच्या निधनानंतर राजा वजिरालोंगकोर्न यांनी राजघराण्यातील सदस्यांना वर्षभराचा शोक कालावधी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोण होत्या राणी सिरिकिट?
राणी सिरिकिट यांचा जन्म १९३२ मध्ये झाला. त्याच वर्षी थायलंडने निरंकुश राजेशाहीतून संवैधानिक राजेशाहीत प्रवेश केला होता. सिरिकिट किटियाकर या थायलंडच्या फ्रान्समधील राजदूताची मुलगी होत्या. त्यांचे शिक्षण पॅरिसमध्ये झाले. तिथेच त्यांची भेट राजा भूमिबोल अदुल्यादेजशी झाली. त्यानंतर त्यांचे लग्न झाले. १९५६ मध्ये जेव्हा राजा भूमिबोलने बौद्ध भिक्षू म्हणून शिक्षण घेण्यासाठी मंदिरात दोन आठवडे घालवले, तेव्हा सिरिकिट यांनी तात्पुरत्या रीजेंट म्हणून काम केले होते.
देशभरात शोक
थायलंडचे लोक त्यांच्या मातृतुल्य महाराणी सिरिकिट यांच्या निधनाने शोक व्यक्त करत आहेत. एक राजेशाही व्यक्तिमत्व असूनही त्यांच्या प्रभावाने देशाच्या आधुनिक राजेशाहीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २०१२ मध्ये स्ट्रोक आल्यापासून त्या सार्वजनिक जीवनातून दूर राहिल्या होत्या, परंतु थाई लोकांनी त्यांना कधीही अंतर दिले नाही.