थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 06:19 IST2025-07-28T06:17:36+5:302025-07-28T06:19:31+5:30
मी थायलंड व कंबोडियाच्या नेत्यांशी बोललो आहे. हा संघर्ष सुरू राहिला तर दोन्ही देशांसोबतचा व्यापार करार पुढे नेणार नाही, असा इशारा या देशांना दिला, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
सुरिन : थायलंड व कंबोडिया या देशांमधील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना यश आले आहे. ट्रम्प यांच्या पुढाकाराने दोन्ही देशांनी शस्त्रसंधीवर चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. असे असले तरी रविवारीदेखील सीमा भागात चकमकी झडत असल्याने तणाव कायम होता.
थायलंड व कंबोडियात गत चार दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत ३३ जण ठार, तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. या संघर्षामुळे दोन्ही देशांमधील १ लाख ६८ हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची तयारी दाखवल्याची माहिती ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडियाद्वारे दिली. मी थायलंड व कंबोडियाच्या नेत्यांशी बोललो आहे. हा संघर्ष सुरू राहिला तर दोन्ही देशांसोबतचा व्यापार करार पुढे नेणार नाही, असा इशारा आपण या देशांना दिला.
त्यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीसाठी वाटाघाटी करण्याची तयारी दाखवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. ता. मुएन थोम या पुरातन मंदिरावरून दोन्ही देशांतील तणाव वाढलेला असताना गुरुवारी सीमेलगत झालेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात थायलंडचे पाच जवान जखमी झाल्यानंतर युद्धाचा भडका उडाला.
कंबोडिया बिनशर्त युद्धबंदीसाठी तयार
आमचा देश कोणत्याही अटी-शर्तीविना तत्काळ शस्त्रसंधी लागू करण्यास तयार असल्याची माहिती ट्रम्प यांच्याशी बोलणे झाल्यानंतर कंबोडियाचे पंतप्रधान हून मानेट यांनी दिली. थायलंडचे प्रभारी पंतप्रधान फुमथम वेचायचाई यांनीदेखील हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवल्याचे ट्रम्प यांनी आपल्याला सांगितले. ही दोन्ही देशांच्या सैन्यासाठी व नागरिकांसाठी सकारात्मक बाब असल्याची माहिती पंतप्रधान मानेट यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
दोन्ही देशांनी मलेशियाच्या अध्यक्षांची मध्यस्थ म्हणून भूमिका स्वीकारली आहे; पंतप्रधान हुन मानेट आणि कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई मंगळवारी, २९ जुलैला बैठकीसाठी मलेशियाला जातील. मात्र, थायलंडने तिसऱ्या देशाची मध्यस्थी नको असल्याची भूमिका घेतली आहे.