भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 10:35 IST2025-07-24T10:35:02+5:302025-07-24T10:35:36+5:30
भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये गृहयुद्ध भडकलेले आहे. त्याच्या पलिकडे थायलंड आणि कंबोडिया हे देश आहेत.

भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव...
जगभरात सध्या तणावाचे वातावरण असून दोन ठिकाणी भीषण युद्ध सुरु आहे. अधून मधून भारत-पाकिस्तान, इस्रायल-इराण अशी छोटी युद्धे सुरुच आहेत. अशातच आशियामध्ये दोन देशांचे सैन्य सीमेवर उभे ठाकल्याने तणाव वाढला आहे. गुरुवारी झालेल्या झटापटीत दोन सैनिक जखमी झाल्याने तणाव आणखी वाढला आहे. थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर ही झटापट झाली आहे.
भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये गृहयुद्ध भडकलेले आहे. त्याच्या पलिकडे थायलंड आणि कंबोडिया हे देश आहेत. थाई सैन्य आणि कंबोडियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की ही चकमक प्रसात ता मुएन थोम जवळील सीमेवर ही झटापट झाली आहे. लँड माईनच्या स्फोटामुळे थायलंडने कंबोडियाच्या राजदूताला हद्दपार केले होते. यामुळे हा तणाव वाढला आणि दोन्ही सैन्य आमने सामने आले होते.
प्रसात ता मुएन थॉम हे थायलंडच्या ईशान्य सुरिन प्रांतात आहे. या भागावर कंबोडियाचा दावा आहे. यामुळे हा भाग दोन्ही देशांमधील वादाचा विषय बनलेला आहे. या चकमकीत किमान दोन सैनिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. ड्रोन दिसल्यानंतर कंबोडियन सैन्याने प्रथम गोळीबार केला आणि सहा सशस्त्र कंबोडियन सैनिक थाई लष्करी चौकीजवळ आले, असे थाई लष्कराने सांगितले आहे. कंबोडियाने देखील प्रत्यूत्तर म्हणून बँकॉकमधून आपले राजनैतिक अधिकारी माघारी बोलविले आहेत.
मे महिन्याच्या अखेरीस दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढण्यास सुरुवात झाली होती. गोळीबारात एका कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाला होता. यानंतर दोन्ही बाजूंनी सीमेवर सैन्याची जमवाजमव करण्यात आली होती. तसेच व्यापाराचे मार्गही बंद करण्यात आले आहेत. या देशांतील तणाव कोणत्याही क्षणी युद्धात बदलण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. सीमेवरील भागातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.