पाकिस्तानमध्ये चर्चजवळ दहशतवादी हल्ला; 8 जण ठार 20 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 15:57 IST2017-12-17T15:57:19+5:302017-12-17T15:57:51+5:30
पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे चर्चवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आठ जण ठार झाले असून20 जण जखमी झाले आहेत. हल्ला करणाऱ्या दोन पैकी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.

पाकिस्तानमध्ये चर्चजवळ दहशतवादी हल्ला; 8 जण ठार 20 जखमी
क्वेट्टा - पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे चर्चवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आठ जण ठार झाले असून20 जण जखमी झाले आहेत. हल्ला करणाऱ्या दोन पैकी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. तर दुसऱ्या दहशतवाद्याने स्वतःला बॉम्बने उडवून घेतले. क्वेट्टा येथे बेथेल मेथेडिस्ट चर्च असून या चर्चवर रविवारी दुपारी दहशतवाद्यांनी हल्ला केला.
यादरम्यान पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. दहशतवाद्यांना वेळीच रोखल्याने त्यांना चर्चच्या आत प्रवेश करता आला नाही. चर्चच्या मुख्य इमारतीपासून 400 मीटर अंतरावरच त्यांना रोखल्याने अनर्थ टळला, असे बलुचिस्तानच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी किमान 300 ते 400 जण येतात, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
दरम्यान चर्चचा परिसर खाली करण्यात आली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरु आहे. परिसरातील सर्व रुग्णालयांना हायअलर्ट जारी करण्यात आल्याचे बलुचिस्तानच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांकडे शस्त्रास्त्रेही होती, असे समजते. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.