दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 09:28 IST2025-10-27T09:27:53+5:302025-10-27T09:28:27+5:30
दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या नौदलाच्या 'यूएसएस निमित्झ' विमानवाहू जहाजाचे MH-60R हेलिकॉप्टर आणि F/A-18F फायटर जेट क्रॅश झाले. चीन-अमेरिका तणावादरम्यान झालेल्या या अपघातात सर्व क्रू सुरक्षित, मात्र नौदलाची चौकशी सुरू.

दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
वॉशिंग्टन/बीजिंग: दक्षिण चीन समुद्रातील वाढत्या चीन-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नौदलाला मोठा धक्का बसला आहे. रविवारी एकाच दिवशी आणि अर्ध्या तासाच्या अंतराने अमेरिकेची दोन विमाने या समुद्रात अपघातग्रस्त झाली. यामध्ये एक एमएच-६०आर सीहॉक हेलिकॉप्टर आणि दुसरे एफ/ए-१८एफ सुपर हॉर्नेट लढाऊ विमान सामील आहे. दोन्ही विमाने अमेरिकेच्या 'यूएसएस निमित्झ' या विमानवाहू युद्धनौकेवरून नियमित मोहिमेवर निघाली होती.
यूएस नौदलाच्या प्रशांत तळावरून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, रविवार दुपारच्या सुमारास हे अपघात झाले. स्थानिक वेळेनुसार दुपारी २.४५ च्या सुमारास एमएच-६०आर सीहॉक हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. सुदैवाने, बचाव कार्यादरम्यान हेलिकॉप्टरमधील तिन्ही क्रू सदस्य सुरक्षितपणे बाहेर काढले गेले. या घटनेनंतर अवघ्या ३० मिनिटांनी, दुपारी ३.१५ च्या सुमारास एफ/ए-१८एफ सुपर हॉर्नेट हे लढाऊ विमानही क्रॅश झाले. या विमानाच्या पायलटलाही वेळीच बाहेर पडण्यात यश आले आणि त्याला सुरक्षित वाचवण्यात आले.
नौदलाने दोन्ही घटनांची चौकशी सुरू केली आहे. यूएसएस निमित्झ हे विमानवाहू जहाज पश्चिम किनाऱ्याकडे परतण्याच्या अंतिम टप्प्यात असताना दक्षिण चीन समुद्रात दाखल झाले होते.
भू-राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर घटना
हा अपघात अशा वेळी झाला आहे, जेव्हा दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. चीन या समुद्रातील मोठ्या भागावर आपला दावा सांगतो, जो आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळला आहे. अमेरिका या भागात नियमितपणे आपली युद्धनौका आणि विमाने पाठवून चीनच्या दाव्यांना आव्हान देत असतो. यूएसएस निमित्झ हे युद्धनौका १७ ऑक्टोबर रोजीच या समुद्रात दाखल झाली होती.