सर्वात मोठी शपथ मोडली, १७ वर्षांनंतर मायदेशी परतलेले तारिक रहमान बांगलादेशचे नशीब बदलणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 14:11 IST2025-12-25T14:05:43+5:302025-12-25T14:11:42+5:30
तारिक रहमान ढाक्यात परतले असून त्यांच्या साक्षीने बांगलादेशच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे.

सर्वात मोठी शपथ मोडली, १७ वर्षांनंतर मायदेशी परतलेले तारिक रहमान बांगलादेशचे नशीब बदलणार?
Tarique Rahman Returns:बांगलादेशच्या राजकारणाने आज एक नवे ऐतिहासिक वळण घेतले आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते आणि माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे पुत्र तारिक रहमान तब्बल १७ वर्षांच्या लंडन मधील वास्तव्यानंतर गुरुवारी ढाका येथे परतले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी ढाका शहराच्या रस्त्यांवर लाखो समर्थकांनी गर्दी केली असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पुनरागमन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
१७ वर्षांपूर्वीची 'ती' शपथ आणि वनवास
बांगलादेशच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक भूकंप झाला आहे. तब्बल १७ वर्षांच्या लंडन मधील अज्ञातवासानंतर तारिक रहमान मायदेशी परतले आहेत. २००८ मध्ये देश सोडताना राजकारणात कधीही परतणार नाही अशी लेखी शपथ देणाऱ्या रहमान यांनी आज ती शपथ मोडत बांगलादेशच्या मातीत पाऊल ठेवले. तारिक रहमान अशा वेळी परतले आहेत जेव्हा बांगलादेश अत्यंत मोठ्या राजकीय संघर्षातून जात आहे. गेल्या वर्षी झालेल्या विद्रोहानंतर शेख हसीना यांना सत्ता सोडावी लागली आणि त्यानंतर रहमान यांच्यावरील भ्रष्टाचाराचे व हत्येच्या कटाचे सर्व ८४ गुन्हे रद्द करण्यात आले. १७ वर्षांपूर्वी जेव्हा रहमान यांना उपचारांसाठी लंडनला जाण्याची परवानगी मिळाली होती, तेव्हा त्यांनी सरकारला राजकारणातून संन्यास घेतल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते. मात्र, आता शेख हसीना यांचे सरकार गेल्यानंतर ते पुन्हा परतले आहेत.
रहमान यांचा जीवनप्रवास संघर्षमह होता. १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात अवघ्या ४ वर्षांचे असताना त्यांना तुरुंगवास सोसावा लागला होता. तर वयाच्या १५ व्या वर्षी त्यांचे वडील झियाउर रहमान यांची हत्या झाली. २००४ मध्ये शेख हसीना यांच्या रॅलीवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात त्यांना मुख्य आरोपी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, हे सर्व आरोप राजकीय सूडबुद्धीतून लावण्यात आल्याचे सांगत आताच्या अंतरिम सरकारने त्यांना क्लीन चिट दिली. लंडनमध्ये असताना त्यांनी फेसबुक आणि स्काईपच्या माध्यमातून आपली पक्षसंघटना जिवंत ठेवली.
सध्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्या व्हेंटिलेटरवर आहेत. अशावेळी तारिक रहमान यांचे परतणे हे त्यांच्या पक्षासाठी संजीवनी ठरणारे आहे. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत तारिक रहमान हे पंतप्रधानपदाचे सर्वात प्रबळ दावेदार म्हणून समोर आले आहेत. १७ वर्षांचा हा वनवास संपवून मायदेशी आलेला हा 'क्राउन प्रिन्स' आता बांगलादेशला हिंसेतून बाहेर काढून नवी दिशा देणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.