China Tank Video: चीनमध्ये बँकांबाहेर रणगाडे, लाखो लोकांची खाती फ्रिज; अब्जावधी डॉलर गायब झाल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 13:02 IST2022-07-21T13:02:19+5:302022-07-21T13:02:58+5:30
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हेनान प्रांतातील आहे. बँकेबाहेर अनेक रणगाडे तैनात केल्याचे दिसत आहेत.

China Tank Video: चीनमध्ये बँकांबाहेर रणगाडे, लाखो लोकांची खाती फ्रिज; अब्जावधी डॉलर गायब झाल्याने खळबळ
चीनमध्ये मोठे बँकिंग संकट उभे ठाकले आहे. परिस्थिती एवढी चिघळलीय की बँकांबाहेर रणगाडे उभे करावे लागले आहेत. लाखो ग्राहकांची अकाऊंटच फ्रिज करण्यात आली आहेत. ग्राहकांनी त्यांचे पैसे बँकेतून काढू नयेत म्हणून चीन निर्दयी वागू लागला आहे. हजारो लोक रस्त्यावर आंदोलन करत आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हेनान प्रांतातील आहे. बँकेबाहेर अनेक रणगाडे तैनात केल्याचे दिसत आहेत. लोकांनी बँकेत घुसू नये म्हणून आंदोलन दडपण्यासाठी हे रणगाडे उभे करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
एप्रिलमध्ये साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती. चिनी बँकांमध्ये झालेल्या घोटाळ्यांवर हे होते. हा घोटाळा 40 अब्ज युआन म्हणजेच ६ अब्ज अमेरिकी डॉलर एवढा असल्याचे म्हटले होते. चिनी बँकांमधून एवढी मोठी रक्कम गायब झाल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर चीनमध्ये मोठी खळबळ उडाली होती. हेनान आणि अनहुई प्रांतात बँकांमधील नागरिकांची खाती वापरण्यास मज्जाव करण्यात आला होता. यावेळी सिस्टिम अपग्रेड करण्यात येत आहे, असे कारण दिले जात होते.
परंतू, जसजसे लोकांना पैसे काढणे कठीण होऊ लागले तसतसे लोकांचा उद्रेक सुरु झाला. त्यात लॉकडाऊन लागल्याने निर्बंध येऊ लागले. या घोटाळ्यात न्यू ओरिएंटल कंट्री बँक ऑफ कॅफेंग, जिचेंग हुआंगहुई कम्युनिटी बँक, शांगकाई हुइमिन काउंटी बँक आणि युजौ शिन मिन शेंग विलेज बँक यांचा समावेश आहे. या बँकांचे ग्राहक गेले तीन महिने पैसे मिळविण्यासाठी बँकांच्या पायऱ्या झिजवत होते. मात्र, आता त्यांचा संयम संपला आणि ते रस्त्यावर उतरले आहेत.
१९८९ मध्ये असाच नरसंहार...
चीन हा कठोर कारवायांच्या देशांमध्ये मोडतो. बँकांबाहेर रणगाडे तैनात केल्याने याची तुलना लोक थियानमन चौकातील घटनेशी करत आहेत. १९८९ लोकांनी सरकारविरोधात या चौकात आंदोलन केले होते. ते चिरडण्यासाठी या लोकांवर चिनी सरकारने रणगाडे चढविले होते. यामध्ये ३००० हून अधिक आंदोलक मारले गेले होते. तर युरोपीय प्रसारमाध्यमांनी या नरसंहाराचा आकडा १० हजार सांगितला होता.