"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:48 IST2025-11-01T12:47:23+5:302025-11-01T12:48:57+5:30
अफगाण तालिबान सरकारमधील माहिती मंत्र्याचे सल्लागार कारी सईद खोस्ती यांनी पाकिस्तानच्या लष्कराची खिल्ली उडवत थेट मुनीर यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सध्या युद्धबंदी झाली असली, तरी शाब्दिक हल्ले मात्र सुरूच आहेत. अफगाण तालिबान सरकारमधील माहिती मंत्र्याचे सल्लागार कारी सईद खोस्ती यांनी पाकिस्तानच्या लष्कराची खिल्ली उडवत थेट मुनीर यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानमध्ये सरकार नसून, लष्करी राजवट असल्याचे त्यांनी म्हटले. इतकंच नाही तर, 'त्यांच्यात इतका दम आहे तर, ७५ वर्षांत काश्मीर का घेऊ शकले नाहीत?', असे म्हणत त्यांनी पाकिस्तानी लष्कराचे वाभाडे काढले. पाकिस्तानच्या सैन्याने सोव्हिएत संघ आणि अमेरिकेविरुद्धच्या युद्धात विजयाचा जो दावा केला, त्यावरही प्रश्न चिन्ह लावले आहे.
खोस्ती यांनी पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी आदिल राजा यांच्यासोबतच्या एका ऑनलाइन व्हिडीओ मुलाखतीतच पाकिस्तानी लष्करावर ताशेरे ओढले आहेत. या मुलाखतीत खोस्ती म्हणाले की, 'पाकिस्तानच्या सैन्यामध्ये एक विशिष्ट वर्ग आहे जो माध्यमांद्वारे जनतेमध्ये असा प्रचार करतो की, आम्ही अमेरिकेला हरवले, आम्ही रशियाला हरवले. पण, जर तुम्ही अमेरिकेला हरवले, अगदी रशिया आणि नाटोला हरवले, तर माझा त्यांना असा सवाल आहे की, पाकिस्तानचा हा फौजी हुकूमरान काश्मीरची काही किलोमीटर जमीन का स्वतंत्र करू शकला नाही?'
या मुलाखतीत खोस्ती म्हणाले की, 'पाकिस्तानी लष्करी अधिकारी फक्त खोटे दावे करतात. प्रत्यक्षात, रशिया आणि अमेरिकेतील युद्धादरम्यान पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्यांनी केवळ अफाट संपत्ती जमवली. ते अब्जाधीश झाले आणि त्यांनी जमिनी खरेदी केल्या.'
पाकिस्तानच्या विजयाचा दावा खोडून काढत त्यांनी म्हटले की, 'अमेरिका आणि सोव्हिएत युनियनविरुद्धच्या विजयात पाकिस्तानी सैन्याची कोणतीही भूमिका नव्हती. हा विजय केवळ अफगाणिस्तानच्या जनतेच्या संघर्षाचा परिणाम होता. गेल्या २१ वर्षांत पाकिस्तानला अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्स मिळाले. हे सगळे पैसे पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्यांनी त्यांचे बंगले बांधण्यासाठी आणि जमिनी खरेदी करण्यासाठी वापरले.
पाकिस्तान आणि तालिबानमधील तणाव वाढत असतानाच खोस्ती यांनी ही मुलाखत दिली आहे. गेल्या महिन्यात सीमाभागात झालेल्या एका आठवड्याच्या भीषण संघर्षानंतर दोन्ही बाजूंनी १९ ऑक्टोबर रोजी युद्धविरामावर सहमती दर्शवली होती. नुकत्याच झालेल्या इस्तंबूलमधील वाटाघाटीमध्ये हा विराम पुढे वाढवण्यास सहमती झाली असली तरी, दोन्ही बाजूंनी अजूनही तणावपूर्ण वातावरण आणि टीका-टिप्पणी सुरूच आहे.