Taliban on Pakistan Jaffer Express Train Hijack : बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेनच्या अपहरणासाठी पाकिस्ताननेअफगाणिस्तानला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, अपहरणाच्या वेळी बलुच लिबरेशन आर्मीचे बंडखोर अफगाणिस्तानात बसलेल्या त्यांच्या प्रमुखांच्या संपर्कात होते. यावर तालिबानने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानने बेजबाबदार वक्तव्य करण्याऐवजी आपल्या सुरक्षा आणि अंतर्गत समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे तालिबानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते अब्दुल काहार बल्खी यांनी रोखठोकपणे सुनावले आहे.
तालिबान काय म्हणाले?
"बलुचिस्तान प्रांतातील प्रवासी ट्रेनवरील हल्ल्याचा संबंध अफगाणिस्तानशी जोडण्याचा काहीही संबंध नाही. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने आमच्यावर केलेले आरोप निराधार आहेत. हे आरोप आम्ही स्पष्टपणे नाकारतो. पाकिस्तानी नेतेमंडळींनी अशी बेजबाबदार विधाने करण्याऐवजी स्वतःच्या सुरक्षा आणि अंतर्गत समस्यांवर लक्ष द्यावे आणि त्या समस्या सोडवण्यावर अधिक मेहनत घ्यावी," अशा शब्दांत अब्दुल काहार बल्खी यांनी ट्विटवरून पाकिस्तानला खडेबोल सुनावले.
मंगळवारी बलुचिस्तानमधील क्वेट्टा शहरातून पेशावरला निघालेली जाफर एक्सप्रेस ट्रेन बलुच लिबरेशन आर्मीने हायजॅक केली. महत्त्वाची बाब म्हणजे एखादा डब्बा नव्हे तर संपूर्ण ट्रेनच हायजॅक करण्यात आली आणि त्यातील प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले. एका बोगद्याजवळील रुळांवर झालेल्या स्फोटामुळे ही ट्रेन रुळावरून घसरली. या ट्रेनमध्ये १०० हून अधिक पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी प्रवास करत होते, जे अजूनही बलुच लिबरेशन आर्मीने ओलीस ठेवले आहेत. सुरक्षा कर्मचारी वगळता त्या ट्रेनमधून प्रवास करणारी मुले, महिला आणि बलुच प्रवासी यांना मात्र सोडून देण्यात आले. त्यामुळे हा पाकिस्तानचा अंतर्गत कलह असल्याचे आंतरराष्ट्रीय विषयातील जाणकारही म्हणत आहेत.