'२४ तासांत येमेन खाली करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 10:40 IST2025-12-31T10:08:53+5:302025-12-31T10:40:58+5:30
एसटीसीने काही दिवसांपूर्वी सौदी अरेबिया आणि ओमानच्या सीमेवर असलेल्या येमेनच्या तेल समृद्ध प्रांत हद्रामौत आणि माहरा यांचा ताबा घेतला आहे.

'२४ तासांत येमेन खाली करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
सौदीच्या नेतृत्वाखालील युतीने मंगळवारी येमेनी बंदर शहर मुकाल्लावर मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ला केला. हल्ल्याचे लक्ष्य इराण समर्थित हुथी बंडखोर नव्हते, तर सौदी अरेबियाचा जवळचा मित्र संयुक्त अरब अमिराती (UAE) ने पाठवलेल्या शस्त्रास्त्रांचा माल होता. या लष्करी कारवाईमुळे दोन्ही आखाती देशांमधील मतभेद सार्वजनिकरित्या उघड झाले आहेत. या प्रदेशात नवीन युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.
युएईच्या फुजैराह बंदरातून दोन जहाजे परवानगीशिवाय मुकाल्ला येथे आली. त्यांनी त्यांची ट्रॅकिंग सिस्टम बंद केली होती, असा आरोप सौदी अरेबियाचा आहे. रियाधच्या म्हणण्यानुसार, या जहाजांमध्ये दक्षिणी संक्रमणकालीन परिषद (STC) फुटीरतावाद्यांसाठी शस्त्रे आणि चिलखती वाहनांचा मोठा साठा होता.
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
हल्ल्यापूर्वी सौदी जेटने नागरिकांना परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला . नंतर शस्त्रास्त्रांचा साठा नष्ट केला. त्यानंतर लवकरच, सौदी समर्थित येमेनी प्रेसिडेंशियल कौन्सिलने युएईसोबतचा आपला सुरक्षा करार रद्द केला आणि अमिराती सैन्याला २४ तासांच्या आत येमेन सोडण्याचा कडक अल्टिमेटम दिला.
येमेनचे तेल समृद्ध प्रांत हद्रामौत आणि माहरा ताब्यात घेतले
सौदी अरेबियासाठी, फुटीरतावाद्यांना शस्त्रास्त्रे देणे ही रेड लाईन होती, ती ओलांडणे खपवून घेण्यासारखे नव्हते. एसटीसीने काही दिवसांपूर्वी येमेनचे तेल समृद्ध प्रांत हद्रामौत आणि माहरा ताब्यात घेतले आहेत. हे भाग सौदी अरेबिया आणि ओमानच्या सीमेवर आहेत. रियाध याला त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी थेट धोका मानतो. दरम्यान, यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.
'जहाजांमध्ये कोणतेही शस्त्रे नव्हती तर येमेनमधील यूएईच्या स्वतःच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या वापरासाठी असलेली वाहने होती. यूएईने सौदी अरेबियाच्या सार्वभौमत्वाचा पूर्णपणे आदर करण्याची शपथ घेतली आहे आणि सौदी अरेबियाला अस्थिर करणाऱ्या कोणत्याही कारवायांमध्ये त्यांचा सहभाग नसल्याचे अबू धाबीचे म्हणणे आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, यूएईने येमेनमधून आपले उर्वरित सैन्य मागे घेण्याची घोषणा केली आहे.
या वादाशी इस्रायलचा संबंध काय?
हा तणाव फक्त प्रादेशिक राजकारणामुळे नाही तर व्यापक धोरणात्मक हितसंबंधांमुळे देखील आहे. अब्राहम करारांतर्गत २०२० मध्ये युएईने इस्रायलशी संबंध सामान्य केले. लाल समुद्र आणि बाब अल-मंडेब सारख्या महत्त्वाच्या सागरी मार्गांवर आपली पकड मजबूत करण्यासाठी इस्रायल दक्षिण येमेनमध्ये स्वतंत्र राज्याला मान्यता देण्याचा विचार करू शकते, असे तज्ञांचे मत आहे.
सौदी अरेबियाला एकसंध येमेन हवे आहे, तर युएईने दक्षिण येमेनसाठी स्वातंत्र्य मागणाऱ्या गटांना पाठिंबा दिला आहे. या वेगवेगळ्या भूमिका आता मोठ्या लष्करी आणि राजनैतिक संघर्षात रूपांतरित झाल्या आहेत.