सीरियात सत्तापालट? बंडखोरांच्या ताब्यात अनेक शहरे; राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळून गेल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 23:38 IST2024-12-07T23:37:47+5:302024-12-07T23:38:19+5:30
Syria Crisis updates: दमास्कसच्या रस्त्यावर सध्या लढाई सुरू आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत.

सीरियात सत्तापालट? बंडखोरांच्या ताब्यात अनेक शहरे; राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळून गेल्याची चर्चा
Syria Crisis updates: सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये बंडखोरांनी मोठा हल्ला केला आहे. त्यामुळे याठिकाणी सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. दमास्कसमधील सिदानिया तुरुंगावर बंडखोरांनी हल्ला केला. या तुरुंगात मोठ्या संख्येने राष्ट्राध्यक्ष बशर असद यांचे विरोधक कैदेत होते. याशिवाय बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष बशर असद यांच्या सैन्याचे रणगाडे देखील ताब्यात घेतले असून हे रणगाडे राष्ट्राध्यक्ष भवनाच्या दिशेने वळवले आहेत.
दमास्कसच्या रस्त्यावर सध्या लढाई सुरू आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. बशर सरकारच्या एका विमानाने राजधानीतून उड्डाण केल्याचा दावा देखील स्थानिक मीडियाने केला आहे. मात्र, या विमानात कोण होते याची माहिती अजून समोर आलेली नाही. राष्ट्राध्यक्ष बशर असद हे देश सोडून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बशर असद यांनी नुकतेच रशियात घर विकत घेतल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे. अशा परिस्थितीत ते आपल्या कुटुंबासह देश सोडून रशियात पळून गेल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, सीरियामध्ये बंडखोरांनी मोठे हल्ले करत सरकारच्या नियंत्रणाखालील अनेक भाग ताब्यात घेतला आहे. स्थानिक मीडिया असा दावा आहे की, बंडखोरांनी दमास्कसला वेढा घालण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इस्लामिक संघटनेचा कमांडर हसन अब्देल घनी याने सांगितले की, त्यांचे सैन्य राजधानीला वेढा घालण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.
याचबरोबर, तुर्कस्तान आणि इराणने सीरियातील सर्व लष्करी कारवाया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, बंडखोरांनी दमास्कसमध्ये आपला विजय साजरा करण्यास सुरुवात केली आहे. सीरियातील या मोठ्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे. बंडखोरांचे हल्ले आणि बशर सरकार कमकुवत झाल्यामुळे देशात राजकीय अस्थिरता आणि हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे.
भारताने व्यक्त केली चिंता
सीरियातील बिघडलेल्या परिस्थितीबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. भारत सरकारने सर्व भारतीय नागरिकांना रात्री उशिरा एक सूचना जारी केली आहे. सीरियाला जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सध्या सीरियामध्ये असलेल्या सर्व भारतीयांना दमास्कसमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, लोकांनी शक्य तितक्या लवकर सीरिया सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.