२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 08:04 IST2025-12-15T08:03:58+5:302025-12-15T08:04:27+5:30
रविवारी दुपारी यहूदी उत्सवावेळी बाँडी बीचवर हजारो लोक जल्लोष साजरा करत होते. त्याचवेळी २ बंदूकधारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.

२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
सिडनीच्या बाँडी बीचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका दहशतवाद्याच्या हातून बंदूक हिसकावणाऱ्या व्यक्तीची ओळख समोर आली आहे. लोक त्याच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. रिअल लाईफमधील हिरो म्हणून हा व्यक्ती सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दहशतवाद्याला पकडून पोलिसांच्या हवाली करणाऱ्या या व्यक्तीचं नाव अहमद अल अहमद असं आहे. तो सदरलँड येथे फळाचं दुकान चालवतो.
रविवारी दुपारी यहूदी उत्सवावेळी बाँडी बीचवर हजारो लोक जल्लोष साजरा करत होते. त्याचवेळी २ बंदूकधारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात कमीत कमी १२ लोकांचा जीव गेला. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याशिवाय २९ लोक या हल्ल्यात जखमी झाले. त्यात २ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या हल्ल्यावेळी एका धाडसी व्यक्तीने जीव धोक्यात घालत एका दहशतवाद्याकडून बंदूक हिसकावून घेतली. ४३ वर्षीय अहमद अल अहमद असं त्या व्यक्तीचे नाव असून सदरलँड भागात त्याचे फळाचे दुकान आहे. अहमद स्थानिक रहिवासी असून त्याला बंदूक चालवण्याचा कुठलाही अनुभव नाही. तो त्या परिसरात जात असताना त्याला हल्ला होताना दिसला. त्यावेळी पळून न जाता त्याने धाडसाने दहशतवाद्याला पकडले.
सोशल मीडियावर व्हायरल फुटेजमध्ये अहमद सफेद शर्ट घातल्याचे दिसतो. तो एका कारच्या मागे लपलेला असतो, तेव्हा गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्याला मागून जात घट्ट पकडून धरतो. जवळपास ५ सेकंदच्या संघर्षानंतर अहमद त्याच्या हातून बंदूक हिसकावतो. त्यानंतर तो दहशतवाद्यावर बंदूक रोखून धरतो. त्यानंतर हल्लेखोर पळून जातो. या दोघांच्या झटापटीत दहशतवाद्याशी मुकाबला करणाऱ्या अहमदला २ गोळ्या लागलेल्या असतात. अहमद सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. तो लवकरच बरा होईल अशी अपेक्षा त्याचा भाऊ मुस्तफा याने व्यक्त केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी यहूदी समुदायावर झालेला हल्ला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केला आहे. घटनास्थळी पोलिसांना स्फोटक साहित्यांनी भरलेली एक कारही सापडली होती, जी बॉम्ब पथकाने निष्क्रिय केली. त्याशिवाय परिसरात अनेक संशयास्पद वस्तूही आढळल्या आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला होता.