Switzerland Bar Blast: जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या स्वित्झर्लंडमधून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वित्झर्लंडमधील अतिशय आलिशान मानल्या जाणाऱ्या क्रांस मोंटाना या स्की रिसॉर्टमध्ये गुरुवारी पहाटे भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने पर्यटक जखमी झाले आहेत. स्विस पोलिसांनी या घटनेला अधिकृत दुजोरा दिला आहे.
मध्यरात्री दीड वाजता काळाचा घाला
स्थानिक वेळेनुसार गुरुवारी पहाटे १:३० वाजता हा स्फोट झाला. स्वित्झर्लंड येथील प्रसिद्ध कॉन्स्टेलेशन बारमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत सुरू होते. पर्यटक डान्स आणि पार्टीमध्ये मग्न असतानाच अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे बारमध्ये भीषण आग लागली. काही क्षण आधी जल्लोष असलेल्या ठिकाणी एकाएकी किंकाळ्या आणि धुराचे लोट पसरले.
मदतकार्य युद्धपातळीवर
घटनेची माहिती मिळताच स्विस पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी पर्यटकांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यासाठी प्रशासनाने तातडीने हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला की घातपात होता? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे.
सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये बार आगीच्या विळख्यात दिसत आहे. सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. क्रांस-मोंटाना हे स्विस आल्प्स पर्वतरांगांमध्ये वसलेले एक अतिशय महागडे आणि लक्झरी स्की रिसॉर्ट आहे. स्वित्झर्लंडची राजधानी बर्नपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी नवीन वर्षाच्या काळात जगभरातून लाखो पर्यटक येत असतात. या स्फोटामुळे येथील पर्यटनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Web Summary : A blast at the Crans Montana ski resort in Switzerland on New Year's Day caused deaths and injuries. The explosion occurred at a bar during celebrations, triggering a fire. Rescue operations are underway, and an investigation is ongoing to determine the cause.
Web Summary : स्विट्जरलैंड के क्रांस मोंटाना स्की रिसॉर्ट में नए साल के दिन एक विस्फोट में मौतें और चोटें आईं। उत्सव के दौरान एक बार में विस्फोट हुआ, जिससे आग लग गई। बचाव कार्य जारी है, और कारण निर्धारित करने के लिए जांच चल रही है।