इंजेक्शन देऊन हत्या अन् टाकीत लावली मृतदेहाची विल्हेवाट; येमेनने भारतीय महिलेला सुनावली फाशीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:40 IST2024-12-31T13:38:09+5:302024-12-31T13:40:14+5:30
येमेनच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतीय परिचारिका निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

इंजेक्शन देऊन हत्या अन् टाकीत लावली मृतदेहाची विल्हेवाट; येमेनने भारतीय महिलेला सुनावली फाशीची शिक्षा
Nimisha Priya : येमेनमध्ये काम करणाऱ्या भारतीय परिचारिका निमिषा प्रियाला हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येमेनच्या राष्ट्रपतींनी या शिक्षेला मंजुरी दिली आहे. यानंतर आता भारत सरकारने निमिषाच्या मदतीचा हात पुढे केला आहे. निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जात असल्याची ग्वाही सरकारने मंगळवारी दिली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सरकारला या प्रकरणाची माहिती आहे आणि कायदेशीर पर्याय शोधण्यात कुटुंबाला मदत केली जात असल्याचे सांगितले.
येमेनच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतीय परिचारिका निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तलाल अब्दो महदी या नागरिकाच्या हत्येप्रकरणी निमिषाला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. यानंतर आता भारत सरकारने निमिषाच्या मदतीचा हात पुढे केला आहे. सोमवारी येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशाद अल-अलिमी यांनी मूळच्या केरळच्या निमिषाच्या फाशीच्या शिक्षेच्या अंतिम आदेशावर स्वाक्षरी केली. माध्यमांच्या वृत्तानुसार निमिषाला एका महिन्याच्या आत फाशीची शिक्षा दिली जाईल.
कोण आहे निमिषा प्रिया?
मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या निमिषा प्रिया हिला २०१७ मध्ये येमेनी नागरिक तलाल अब्दो महदीच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. निमिषा २०१२ मध्ये नर्स म्हणून येमेनला गेली होती. २०१५ मध्ये निमिषा आणि तलाल यांनी मिळून तिथे क्लिनिक सुरू केले. तलालने क्लिनिकमध्ये शेअरहोल्डर म्हणून नाव समाविष्ट करून आणि स्वतःला निमिषाचा पती म्हणून दाखवून फसवणूक करून अर्ध्या उत्पन्न लाटण्याचा प्रयत्न केला. याबाबत निमिषाने विचारणा केली असता दोघांमध्ये वाद सुरू झाला. तलालने तिला मारहाण आणि लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली.
या छळाला कंटाळून निमिषाने जुलै २०१७ मध्ये तलालला विषारी इंजेक्शन दिले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. निमिषाच्या दाव्यानुसार तलालला मारण्याचा हेतू नव्हता. तिला फक्त तलालकडे असलेला तिचा पासपोर्ट परत मिळवायचा होता. निमिषाची आई प्रेमकुमार यांनी येमेनला जाऊन आपल्या मुलीला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पण येमेनच्या कनिष्ठ न्यायालयाने निमिषाला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. त्याचवेळी येमेनच्या सर्वोच्च न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
सुनावणीदरम्यान, तलालच्या मृत्यूनंतर निमिषाने तिचा मित्र अब्दुल हनानच्या मदतीने त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि पाण्याच्या टाकीत त्याची विल्हेवाट लावली,अशी माहिती समोर आली. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी ऑगस्ट २०१७ मध्ये दोघांनाही अटक केली. आरोप खरे ठरल्याने न्यायालयाने निमिषाला फाशीची तर अब्दुल हनानला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तलालच्या हत्येनंतर निमिषाने येमनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र तिला अटक करण्यात आली.