शिकागो : मराठी माणसांच्या नाट्यप्रेमामुळेच जागतिक रंगभूमीवर मराठी नाट्य क्षेत्राने आजवर मोठे योगदान दिले आहे; परंतु दोन महिन्यांपासून कोरोनाचे महाभयानक नाट्य सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व नाट्यप्रयोग बंद पडले आहेत. अशा अवस्थेत हातावरचे पोट असणाऱ्या पडद्यामागील कलाकारांची अवस्था फारच बिकट झाली आहे. यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील रंगमंच संस्था आणि बृहन्महाराष्ट्र मंडळ आॅफ नॉर्थ अमेरिका (बीएमएम), उत्तर अमेरिकेतील अनेक नाट्य संस्था, नाट्य कलाकार, अनेक नाट्य रसिक यांनी मिळून मदतनिधी उभारला आहे. ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ आॅफ नॉर्थ अमेरिका’च्या अध्यक्षा विद्या जोशी आणि संपूर्ण कार्यकारिणी समिती, रंगमंचचे संस्थापक माधव आणि स्मिता कहाडे यांनी या प्रकल्पाला आपले समर्थन दिले आहे. या कामासाठी पुढे येण्याचे आवाहन विजय केंकरे, अजित भुरे, प्रशांत दामले, अमेय वाघ, संकर्षण कहाडे, जादूगार जितेंद्र रघुवीर, अमेरिकेतील मीना नेरूरकर आणि अनेक स्थानिक कलाकारांनी केले आहे.>१५,००० डॉलर्स झाले जमाहा उपक्रम सुरू झाल्यानंतर १५ दिवसांच्या आतच १५,००० अमेरिकन डॉलर्स जमा झाले आणि हा मदतीचा ओघ आणि आकडा वाढतोच आहे. या कामासाठी महाराष्ट्र फाऊंडेशनचे वैभव साठे, राजीव भालेराव यांनी मोलाचे सहकार्य केले. महाराष्ट्रदिनी संकलित निधी वितरित करण्याची योजना आहे.
पडद्यामागील कलाकारांना मदत, बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकातर्फे उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 04:40 IST