खुशखबर! सुनिता विल्यम्स याच महिन्यात पृथ्वीवर परतणार; म्हणाल्या- 'परतण्याची आशा नव्हती...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 18:31 IST2025-03-06T18:31:16+5:302025-03-06T18:31:42+5:30
अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच बिल्मोर 9 महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत.

खुशखबर! सुनिता विल्यम्स याच महिन्यात पृथ्वीवर परतणार; म्हणाल्या- 'परतण्याची आशा नव्हती...'
Sunita Williams Update: गेल्या 9 महिन्यांपासून अंतराळात अडकलेले NASA चे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. सुनिता आणि बुच लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 19 मार्च 2025 रोजी नासा या दोघांना पृथ्वीवर आणणार आहे. इलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्स या मिशनमध्ये मदत करत आहे. दरम्यान, अंतराळातून परतण्याबाबत सुनिता यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली.
'...ती ठिणगी गमवायची नाही'
मीडिया रिपोर्टनुसार, ऑनलाईन पत्रकार परिषदेला संबोधित करताना सुनिता विल्यम्सने सांगितले की, पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना सर्वात जास्त कशाची आठवण होईल. त्या म्हणाल्या, "सर्व काही. ही बुच आणि माझा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा तिसरा प्रवास आहे. आम्ही हे तयार करण्यात मदत केली आणि अनेक वर्षांमध्ये यात बदल होताना पाहिला. येथे राहिल्यामुळे एक अनोखा दृष्टीकोन मिळतो. मी पृथ्वीवर परतल्यानंतर नवीन प्रेरणा आणि दृष्टीकोनाची ती ठिणगी गमावू इच्छित नाही."
"आम्ही अंतराळात घालवलेल्या वेळेचा आनंद लुटला. आमच्यासाठी हे फक्त एक मिशन होते, पण आमच्या कुटुंबांसाठी आणि समर्थकांसाठी रोलरकोस्टर राईड होती. सर्वात कठीण भाग म्हणजे, आम्ही परत कधी येऊ, हेदेखील आम्हाला माहित नव्हते. आम्ही रोज ठराविक कामे करुन प्रत्येक दिवस मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न करतो," असेही त्या म्हणाल्या.
9 महिन्यांपासून अंतराळात अडकले
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीला केवळ एक आठवड्यासाठी अंतराळात गेले होते, परंतु बोईंग स्टारलाइनरमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली, ज्यामुळे यानाला या दोघांशिवाय पृथ्वीवर परतावे लागले. अनेक प्रयत्न करुनही दोघांना पृथ्वीवर परत आणणे शक्य झाले नाही. अखेर इलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्स नासाच्या मदतीसाठी पुढे आली. या महिन्यातच सुनिता आणि बुच परतणार आहेत.