व्यापारावर ‘सुवेझ’चे संकट, आफ्रिकेमार्गे जहाजे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 08:40 AM2021-03-29T08:40:02+5:302021-03-29T08:40:52+5:30

Suez crisis over trade : इजिप्तच्या सुवेझ कालव्यात अडकलेले ‘एव्हर गिव्हन’ हे अजस्र जहाज काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाचव्या दिवशीही यश मिळाले नाही. जहाज हटविण्यासाठी किती दिवस लागू शकतात, याबाबत सांगू शकत नाही, असे कालवा प्राधिकारणाचे प्रमुख ओसामा राबेई स्पष्ट केले.

Suez crisis over trade, shipping via Africa | व्यापारावर ‘सुवेझ’चे संकट, आफ्रिकेमार्गे जहाजे रवाना

व्यापारावर ‘सुवेझ’चे संकट, आफ्रिकेमार्गे जहाजे रवाना

Next

कैराे : इजिप्तच्या सुवेझ कालव्यात अडकलेले ‘एव्हर गिव्हन’ हे अजस्र जहाज काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाचव्या दिवशीही यश मिळाले नाही. जहाज हटविण्यासाठी किती दिवस लागू शकतात, याबाबत सांगू शकत नाही, असे कालवा प्राधिकारणाचे प्रमुख ओसामा राबेई स्पष्ट केले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर सुवेझचे संकट आणखी काही दिवस राहणार असून, काही कंपन्यांनी आफ्रिकेच्या पर्यायी मार्गाने जहाजे वळविण्यास सुरुवात केली आहे. या संकटाचा जास्त परिणाम हाेऊ नये, यासाठी भारताने चतु:सूत्री उपाययाेजनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. 

जपानच्या कंपनीचे ‘एव्हर गिव्हन’ हे जहाज चीनहून नेदरलँडमधील राॅटरडॅम बंदरावर जात असताना मंगळवारी सुवेझ कालव्यात तिरपे हाेऊन अडकले. त्यामुळे कालव्यातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. 
पाच दिवसांपासून ते हटविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र,  त्यास किती दिवस लागतील, हे सांगता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, हाॅलंड आणि इटलीच्या दाेन टग बाेटी लाल समुद्राच्या मार्गे मदतीसाठी दाखल झाल्या आहेत.  

भारताची उपाययाेजना
आफ्रिकेमार्गे जहाजे वळविण्याचा पर्याय खुला आहे. नाशवंत वस्तूंच्या मालवाहतुकीला प्राधान्य देण्यात येईल, तसेच जेएनपीटी, मुंद्रा आणि हाजिरा बंदरांवरही काेंडी हाेऊ शकते. त्याबाबतही नियाेजन करण्यात येईल. याबाबत केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली हाेती. 

व्यापारावर परिणाम
दरराेज सुमारे १०० जहाजे या मार्गाचा वापर करतात. मात्र, मार्ग बंद झाल्यामुळे तासाला २८०० काेटी रुपयांचा व्यापार ठप्प पडला आहे. आठवडाभरात सरासरी ९.७ अब्ज डाॅलर्सची मालवाहतूक ठप्प झाली आहे.  कच्च्या तेलाचा पुरवठा करणारी ३० हून अधिक जहाजे अडकल्यामुळे इंधन तुटवडाही हाेण्याची भीती आहे.   

अमेरिकेचा मदतीचा प्रस्ताव : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्याे बायडेन यांनी सुवेझचा तिढा साेडविण्यासाठी मदतीचा प्रस्ताव दिला आहे. अमेरिकेकडे जहाज माेकळे करण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि तांत्रिक क्षमता असल्याचे बायडेन यांनी सांगितले.

Web Title: Suez crisis over trade, shipping via Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.