'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 08:46 AM2024-05-08T08:46:34+5:302024-05-08T08:46:58+5:30

Maharashtra Politics : २६/११ हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूमबाबत ठाकरे गटाने त्यांच्या मुखपत्रातून मोठा दावा केला आहे.

Maharashtra Politics Major claim of Thackeray group on Hemant Karkare Death | 'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा

'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा

Hemant Karkare Death: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा आधार घेत भाजपचे उमेदवार जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वडेट्टीवार यांच्या आरोपांवर भाजप चांगलीच आक्रमक झालीय. हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती. तर ती गोळी आरएसएस समर्थक एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती. त्यावेळी हे पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. मात्र आता काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाने हौतात्म्याचे धिंडवडे कोणीच काढू नयेत, असे म्हणत वेगळी भूमिका घेतली आहे. सामना अग्रलेखातून ठाकरे गटाने भाजपने हेमंत करकरे यांच्या मृत्यूसंदर्भातील विषयास फोडणी दिल्याचंही म्हटलं आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे -

गोळीबार केला हे सत्य आहे

"निवडणूक काळात कधी कोणत्या विषयाचा धुरळा उडवला जाईल व गाडलेले मुडदे उकरून काढले जातील त्याचा नेम नाही. ‘२६/११’चा मुंबईवरील हल्ला हा दहशतवाद्यांचाच हल्ला होता व त्यामागे पाकिस्तानचेच षडयंत्र होते. पाकिस्तानने समुद्रमार्गे पाठवलेल्या कसाब व त्याच्या टोळीने ताज महाल हॉटेल, कामा इस्पितळ, छाबड हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा सार्वजनिक ठिकाणी हल्ले केले. रक्ताचे सडे पाडले. मुंबईसह संपूर्ण देश हा हल्ला प्रत्यक्ष पाहत होता. मुंबईचे पोलीस दल बेसावध असताना हल्ला झाला. त्यामुळे एकच धावाधाव झाली. कसाब टोळीच्या हल्ल्यात तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासह वीसेक पोलिसांना हौतात्म्य पत्करावे लागले. हे सर्व अधिकारी दहशतवाद्यांच्याच गोळ्यांना बळी पडले. त्यांच्या हौतात्म्याने देश हळहळला. मरीन लाइन्स येथे फौजदार तुकाराम ओंबळे यांनी पळून जाणाऱ्या कसाबला अडवले व झडप घातली. त्या झटापटीत ओंबळे हे जागीच शहीद झाले. कसाबच्या हल्ल्यात ओंबळे शहीद झाले हे त्या दिवशी जगाने पाहिले व ओंबळे यांच्या शौर्यास मानवंदना दिली. कामठे, करकरे, साळसकर शहीद झाले तर सदानंद दाते यांच्यासह इतर पोलीस अतिरेक्यांशी लढतानाच गंभीर जखमी झाले. अशोक कामठे यांच्यासोबत ‘चकमक’फेम विजय साळसकर यांनाही कामा इस्पितळाच्या अंधाऱ्या गल्लीत वीरमरण आले. अंधाराचा फायदा घेऊन अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला हे सत्य आहे."

निकम हे छुपे संघवादी 

"‘२६/११’च्या हल्ल्यात शहीद झालेल्या प्रत्येक पोलिसाला पाकड्या अतिरेक्यांचीच गोळी लागली, पण हेमंत करकरे यांना अतिरेक्यांची गोळी लागली नसून त्यांची हत्या झाल्याची थिअरी का सुरू झाली? हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामागे कोणाचे तंत्र आहे हे समजून घेतले पाहिजे. २६/११चा खटला चालवणारे उज्ज्वल निकम हे वकील भारतीय जनता पक्षातर्फे उत्तर मुंबईत निवडणूक लढत आहेत. निकम हे छुपे संघवादी होते हे आता उघड झाले व त्यांनी कसाबच्या खटल्यातील अनेक सत्य दडवले व प्रचारात अनेक खोटे मुद्दे आणले. ते कशासाठी?

संघ परिवार व करकरे यांच्यात ठिणगी

"कसाब हा एक भयंकर अपराधी होता व त्यास इतर सामान्य कैद्याप्रमाणेच ऑर्थर रोड तुरुंगात वागणूक मिळत होती. तरीही अॅड. निकम खोटे बोलत राहिले, पण महत्त्वाचा विषय आहे हेमंत करकरे यांचा. करकरे यांच्या बाबतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच भांडण सुरू होते. संघ परिवार करकरे यांच्या कार्यपद्धतीवर व त्यांनी हिंदुत्ववाद्यांवर केलेल्या कारवाईवर खूश नव्हता. मालेगाव बॉम्बस्फोटाचे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून हेमंत करकरे हाताळत होते. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद वगैरे संघ परिवाराशी संबंधित लोकांना करकरे यांनी अटक केली. मालेगावातील बॉम्बस्फोट हे संघाचे कारस्थान असल्याचे करकरे व त्यांच्या पथकाचे म्हणणे होते व तपासात त्यांनी तसे पुरावे समोर आणले. प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित यांचा कोठडीत छळ सुरू आहे व त्यांच्या तोंडून हवे ते काढून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संघाचे म्हणणे होते. मालेगावचा कट करकरे यांच्यामुळे उघडा पडला व देशात हिंदू-मुसलमान दंगे घडविण्याचा ‘डाव’ कसा खेळला जात आहे ते करकरे यांच्यामुळे उघड झाले. त्यामुळे संघ परिवार व करकरे यांच्यात ठिणगी पडली."

हौतात्म्याचे धिंडवडे कोणीच काढू नयेत

"विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे लोकसभा उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर टीका करताना करकरे यांच्या हौतात्म्याचा संदर्भ दिला. भारतीय जनता पक्षाकडे सध्या कोणतेच मुद्दे नसल्याने त्यांनी या विषयास फोडणी दिली. भाजपचा हा स्वभाव आहे. मुळात सध्या भाजपच्या गोटातील ‘स्टार प्रचारक’ हसन मुश्रीफ यांच्याच घरातून करकरे यांची बदनामी सुरू झाली. मुश्रीफ यांचे तेव्हा पोलीस खात्यात असलेले भाऊ एस. एम. मुश्रीफ यांनी करकरे यांच्या मृत्यूमागे रहस्य असल्याचे प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे भाजप नेत्यांच्या मनात काही शंका असतील तर त्यांनी कागल येथे जाऊन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करावी. करकरे हे देशासाठी शहीद झाले व देशाला या वीरपुत्राचा अभिमान आहे. शिवसेनेची तीच भूमिका आहे. हौतात्म्याचे धिंडवडे कोणीच काढू नयेत."

Web Title: Maharashtra Politics Major claim of Thackeray group on Hemant Karkare Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.