सूडानमधील अल फशर शहरातील एका रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात ७० जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमुखांनी ही माहिती दिली आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस एडनोम घेब्रेयेसस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एका पोस्टद्वारे ही आकडेवारी सादर केली.
उत्तर दारफूर प्रांताच्या राजधानीतील अधिकाऱ्यांनी आणि इतरांनीही अशीच आकडेवारी दिली, परंतु घेब्रेयेसस हा मृतांची संख्या देणारा पहिला आंतरराष्ट्रीय सोर्स आहे. सूडानमधील अल फशर येथील सौदी रुग्णालयावर झालेल्या भयानक हल्ल्यात १९ रुग्ण जखमी झाले आणि ७० लोक मृत्युमुखी पडले. हल्ल्याच्या वेळी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होते असं घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे.
येथे विशेष म्हणजे WHO प्रमुखांनी रुग्णालयावर हल्ला कोणी केला हे सांगितलं नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासाठी रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) ला जबाबदार धरलं आहे. आरएसएफने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
एप्रिल २०२३ पासून सूडानी सैन्य रॅपिड सपोर्ट फोर्सेसशी युद्ध करत आहे. या लोकांनी दारफूरचा जवळजवळ संपूर्ण पश्चिम भाग ताब्यात घेतला आहे. त्यांनी मे महिन्यापासून उत्तर दारफूरची राजधानी एल-फाशेरला वेढा घातला आहे परंतु सूडानी सैन्याने त्यांना वारंवार तेथून मागे ढकलल्यामुळे ते शहरावर दावा करू शकले नाहीत.
वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं की, काही आठवड्यांपूर्वी याच रुग्णालयाच्या इमारतीवरही आरएसएफ ड्रोनने हल्ला करण्यात आला होता. अल-फशेरमध्ये वैद्यकीय सुविधांवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत.