Donald Trump At UNGA : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एका भारतपाकिस्तान युद्धाबाबत मोठं विधान केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धाचा उल्लेख करत जगातील सात युद्धे थांबवल्याचे म्हटलं. मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ८० व्या सत्राला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हटलं. तसेच संयुक्त राष्ट्रांनी जगातील कोणतेही युद्ध थांबवलेले नसल्याचेही ट्रम्प म्हणाले.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण दिले, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या सध्याच्या व्हाईट हाऊसच्या भूमिकेवर आणि अमेरिकेच्या जागतिक सामर्थ्यावर भर दिला. सात युद्धे थांबवल्याचा दावा करत ट्रम्प म्हणाले की मी भारत-पाकिस्तान आणि इस्रायल-इराण सात "अंतहीन युद्धे" संपवली आहेत. मला वाटते की संयुक्त राष्ट्रांनी ते करायला हवं होतं, पण मला ते करावे लागले."
"मी सात युद्धे संपवली. यामध्ये कंबोडिया आणि थायलंड, कोसोवो आणि सर्बिया, काँगो आणि रवांडा, पाकिस्तान आणि भारत, इस्रायल आणि इराण, इजिप्त आणि इथिओपिया आणि आर्मेनिया आणि अझरबैजान यांचा समावेश आहे. कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने किंवा पंतप्रधानाने आणि खरंच कोणत्याही देशाने असे काहीही केले नाही. मी ते फक्त सात महिन्यांत केले. हे यापूर्वी कधीही घडले नव्हते. मला ते करण्याचा खूप अभिमान वाटतो. संयुक्त राष्ट्रांऐवजी मला हे करावे लागले हे खूप वाईट आहे आणि दुर्दैवाने, या सर्व प्रकरणांमध्ये संयुक्त राष्ट्रांनी त्यापैकी कोणत्याही युद्धात मदत करण्याचा प्रयत्नही केला नाही. मी सात युद्धे संपवली, या सर्व देशांच्या नेत्यांशी बोललो. पण युद्ध संपवण्याच्या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांकडून मला एकही फोन आला नाही, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
"संयुक्त राष्ट्रांकडून मला फक्त एक एस्केलेटर मिळाला जो वर जाताना मध्येच थांबला. जर फर्स्ट लेडी यांची तब्येत चांगल्या नसती तर त्या पडल्या असत्या, पण त्या चांगल्या स्थितीत आहेत. आम्ही दोघेही चांगल्या स्थितीत आहोत. आणि मग एक टेलिप्रॉम्प्टर काम करत नव्हता. संयुक्त राष्ट्रांकडून मला या दोन गोष्टी मिळाल्या. मला जाणवले की संयुक्त राष्ट्र आमच्यासोबत नाही. मी खरंच नंतर याचा विचार केला. तसे असले तरी, संयुक्त राष्ट्रांचा उद्देश काय आहे? संयुक्त राष्ट्रांमध्ये इतकी प्रचंड क्षमता आहे. त्यात इतकी प्रचंड क्षमता आहे पण बहुतेकदा ते त्या क्षमतेपर्यंत पोहोचण्याच्या जवळही जात नाही," अशीही टीका ट्रम्प यांनी केली.