"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 00:00 IST2025-04-24T23:58:31+5:302025-04-25T00:00:13+5:30
पाकिस्तानने भारताला लागून असलेल्या सीमेवर सैनिकांची संख्या वाढवली आहे. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानने आपल्या सैनिकांना बंकरमधूनच लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. यामुळे, भारताकडून हल्लाही होऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानी नागरिकांना सतावत आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारही सक्रिय झाले आहे. पाकिस्तानने भारताला लागून असलेल्या सीमेवर सैनिकांची संख्या वाढवली आहे. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानने आपल्या सैनिकांना बंकरमधूनच लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता.
सीएनएन-न्यूज१८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रावळपिंडी येथे मुख्यालय असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या १० व्या कॉर्प्सला आणि सियालकोटमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या सैन्याला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी सैनिकांना सीमेजवळील बंकरमध्येच राहण्यास सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे, भारताचेही संपूर्ण सैन्य सतर्क आहे. दरम्यान, भारताने जी-२० देशांच्या राजदूतांना बोलावून पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात देशातील विविध राजकीय पक्षांचे मत जाणून घेण्यासाठी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीसाठी सर्व प्रमुख पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. सर्वांनी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, आरोग्यमंत्री जेपी नड्डा, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, तसेच विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.