दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर श्रीलंका! चीन-जपानच्या अब्जावधी डॉलर्सचं काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 16:47 IST2022-04-12T16:46:08+5:302022-04-12T16:47:16+5:30
आर्थिक संकटात अडकलेल्या या देशाने, आपण काही दिवसांसाठी दुसऱ्या देशांकडून घेतलेले 5,100 कोटी डॉलरचे कर्ज फेडू शकणार नाही, असे म्हटले आहे.

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर श्रीलंका! चीन-जपानच्या अब्जावधी डॉलर्सचं काय होणार?
श्रीलंकेतील आर्थिक संकट (Sri Lanka Economic Crisis) सातत्याने वाढताना दिसत आहे. आता तर, आर्थिक संकटात अडकलेल्या या देशाने, आपण काही दिवसांसाठी दुसऱ्या देशांकडून घेतलेले 5,100 कोटी डॉलरचे कर्ज फेडू शकणार नाही, असे म्हटले आहे. कारण, इंटरनॅशनल मॉनेटरी फंडकडून (IMF) श्रीलंकेला बेलआउट पॅकेज मिळू शकलेले नाही. श्रीलंकेचे ट्रेझरी सेक्रेटरी महिंद्रा सिरीवर्दने यांनी मंगळवारी ही घोषणा केली.
यासंदर्भात, श्रीलंकेच्या अर्थमंत्रालयाने कर्ज दिलेल्या देशांच्या सरकारांना आणि इतर कर्जदारांना, मंगळवारनंतर जे व्याज देय आहे, त्यासाठी एक तर काही काळ वाट पाहावी लागेल अथवा श्रीलंकन रुपयांत पेमेंट स्वीकारावे लागेल, असे सांगितले आहे.
आयएमएफसोबत सुरू राहील चर्चा -
याच वेळी, बेलआउट पॅकेजसंदर्भात आयएमएफसोबत चर्चा सुरूच राहील, असे श्रीलंकन सरकारने म्हटले आहे. याशिवाय, श्रीलंकन सरकारने इतर देशांकडूनही द्विपक्षीय सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यातच, देशाकडे असलेले सध्याचे परकीय चलन जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी वापरले जाईल, असे श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेचे नवे गव्हर्नर नंदलाल वीरसिंघे यांनी म्हटले आहे.
श्रीलंकेवर कुणाचे किती कर्ज -
श्रीलंकेवर असलेल्या एकूण कर्जाचा विचार करता, लंकेने 47 टक्के कर्ज बाजारातून घेतले आहे. तर चीनकडून सुमारे 15 टक्के, आशियाई विकास बँकेकडून 13 टक्के, जागतिक बँकेकडून 10 टक्के, जपानकडून 10 टक्के आणि भारताकडून 2 टक्के एवढे कर्ज घेतले आहे.