Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील आंदोलकांच्या हल्ल्यात भारतीय अधिकारी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 19:25 IST2022-07-19T19:25:32+5:302022-07-19T19:25:51+5:30
Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील आंदोलकांनी भारतीय हाय कमिशनमधील अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली असून, या जीवघेण्या हल्ल्यात भारतीय हाय कमिशनमधील एक ज्येष्ठ अधिकारी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील आंदोलकांच्या हल्ल्यात भारतीय अधिकारी गंभीर जखमी
कोलंबो - ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीलंकेत मोठं आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळे श्रीलंकेतील जनतेमधील असंतोष उफाळून आला असून, तिथे सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे. दरम्यान, श्रीलंकेतील आंदोलकांनी भारतीय हाय कमिशनमधील अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली असून, या जीवघेण्या हल्ल्यात भारतीय हाय कमिशनमधील एक ज्येष्ठ अधिकारी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. भारतीय हायकमिशनकडून याबाबतची माहिती आज देण्यात आली.
श्रीलंकेत घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हाय कमिशनकडून भारतीय नागरिकांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. श्रीलंकेतील घडामोडींची माहिती घेत राहा आणि त्यानुसार ये जा करा, तसेच अन्य कामांचे नियोजन करा, असा सल्ला देण्यात आला आहे.
भारतीय हाय कमिशनने एका ट्विटमध्ये सांगितले की, भारत आणि श्रीलंकेतील जनतेचे संबंध नेहमी सौहार्दपूर्ण आणि मैत्रिपूर्ण राहिले आहेत. सद्यस्थितीत श्रीलंकेत राहत असलेल्या भारतीय नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी नवीन घडत असलेल्या घटनांबाबत सावध राहावे. तसेच परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत.
हाय कमिशनमधील अधिकाऱ्यांनी सकाळी भारतीय नागरिक आणि भारतीय व्हिसा केंद्राचे संचालक विवेक वर्मा यांची भेट घेतली. ते सोमवारी रात्री कोलंबो जवळ विनाकारण करण्यात आलेल्या हल्ल्यात जखमी झाले होते.