तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? आफ्रिकेत युद्धाचा नवा मोर्चा; इथिओपिया आणि इरिट्रिया पुन्हा आमनेसामने!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 15:46 IST2026-02-18T15:45:15+5:302026-02-18T15:46:43+5:30
इथिओपियाने आपल्या शेजारील देश इरिट्रियाविरुद्ध युद्ध पुकारण्याची तयारी पूर्ण केली आहे.

तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? आफ्रिकेत युद्धाचा नवा मोर्चा; इथिओपिया आणि इरिट्रिया पुन्हा आमनेसामने!
रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्धाच्या आगीत जग होरपळत असतानाच, आता आफ्रिकेतून युद्धाची मोठी बातमी येत आहे. इथिओपियाने आपल्या शेजारील देश इरिट्रियाविरुद्ध युद्ध पुकारण्याची तयारी पूर्ण केली आहे. इरिट्रियाच्या सीमेवर इथिओपियाने आपल्या सैन्याची लामबंदी तीव्र केली असून, कधीही प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वादाचे मूळ काय?
इथिओपियाच्या अंतर्गत सुरक्षेत इरिट्रिया ढवळाढवळ करत असल्याचा आरोप इथिओपियाने केला आहे. इथिओपियातील 'तिग्ने' बंडखोरांना इरिट्रियाकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जात आहे, ज्यामुळे इथिओपियामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. या बंडखोरांना ठेचण्यासाठी आणि इरिट्रियाला धडा शिकवण्यासाठी इथिओपियाच्या सैन्याने पाश्चात्य सीमेकडे कूच केली आहे.
६ लाख लोकांचा मृत्यू आणि अपयशी शस्त्रसंधी
२०२० ते २०२२ दरम्यान इथिओपियामध्ये भीषण यादवी युद्ध रंगले होते. या युद्धात इरिट्रियाचा पाठिंबा असलेल्या तिग्ने बंडखोरांनी मोठा हिंसाचार केला, ज्यामध्ये सुमारे ६ लाख निरपराध लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली खरी, पण ती कागदावरच राहिली. आता पुन्हा एकदा इथिओपियाची सेना पूर्ण ताकदीनिशी कारवाईच्या तयारीत आहे.
जुना इतिहास आणि रक्ताचा संघर्ष
इरिट्रिया हा देश १९९३ मध्ये इथिओपियापासून वेगळा होऊन स्वतंत्र झाला. मात्र, त्यानंतरही दोघांमधील संबंध कधीच सुधारले नाहीत. १९९८ मध्ये सीमावादावरून या दोन्ही देशांत भीषण युद्ध झाले होते, जे दोन वर्षे चालले. त्या युद्धात १ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली आहे.
जागतिक राजनैतिक वर्तुळात चिंता
इथिओपिया आणि इरिट्रियामधील या लष्करी हालचालींमुळे पाश्चात्य देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. "दोन्ही बाजूंनी घेराबंदी सुरू झाली असून युद्ध कधीही पेटू शकते," असे एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना एका राजनैतिक अधिकाऱ्याने सांगितले. जर हे युद्ध सुरू झाले, तर आधीच महागाई आणि गरिबीने ग्रासलेल्या आफ्रिकन खंडासाठी हा मोठा तडाखा असेल. आता जागतिक संघटना हा संघर्ष रोखण्यात यशस्वी होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.