डेटिंगसाठी युवक-युवतींना देणार २८ हजार, लग्नासाठी देणार ११ लाख ६० हजार रुपये, जन्मदर वाढवण्यासाठी या देशाने लढवली शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 06:18 IST2025-03-30T06:17:30+5:302025-03-30T06:18:34+5:30
South Korea News: देशातील कमी होत असलेली लोकसंख्या ही अनेक देशांमधील मोठी समस्या आहे. जन्मदर कमी झाल्याने दक्षिण कोरियामध्ये चिंतेचे वातावरण आहे. जन्मदर वाढावा, देशाची लोकसंख्या वाढावी यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे.

डेटिंगसाठी युवक-युवतींना देणार २८ हजार, लग्नासाठी देणार ११ लाख ६० हजार रुपये, जन्मदर वाढवण्यासाठी या देशाने लढवली शक्कल
सेऊल - देशातील कमी होत असलेली लोकसंख्या ही अनेक देशांमधील मोठी समस्या आहे. जन्मदर कमी झाल्याने दक्षिण कोरियामध्ये चिंतेचे वातावरण आहे. जन्मदर वाढावा, देशाची लोकसंख्या वाढावी यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे. आता जन्मदर वाढावा, लोकसंख्या वाढावी यासाठी सरकारने युवकांनाप्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रोत्साहन केवळ शाब्दिक नसून त्यासाठी सरकार पैसे मोजणार आहे.
युवक-युवतींनी एकत्र यावे, डेटिंगवर जावे, विवाह करावा यासाठी सरकार आर्थिक मदत करणार आहे. यावरून तेथील सरकार किती गांभीर्याने ही पावले उचलत आहे याची कल्पना येते. सरकारने युवक-युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. तरुणांना डेटवर जाण्यासाठी सरकारने अनेक डेटिंग अॅप्सना सोयी-सवलती दिल्या आहेत. सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून आणि डेटिंग इव्हेंट्सचेही आयोजन केले जात आहे.
डेटिंग इव्हेंंटचे आयोजन
डेटिंगसाठी आयोजित इव्हेंटमध्ये युवक-युवती एकमेकांना भेटतात आणि ओळख वाढवतात. ते एकमेकांना पसंत करू लागले आणि डेटवर जायचे ठरवले तर त्याचा खर्च देखील रकार उचलते. सरकार डेटवर जाणाऱ्या जोडप्याला ३४० डॉलर (सुमारे २८ हजार रुपये) खर्च करण्यासाठी देते. जर जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला तर सरकार त्यांना १४ हजार डॉलर (सुमारे ११ लाख ६० हजार रुपये) रक्कम बक्षीस म्हणून देते. लग्न केलेल्यांना घर खरेदीसाठी अनुदान दिले जाते. गर्भधारणेशी संबंधित खर्च आणि परदेश प्रवासासाठी देखील पैसे सरकारकडून दिले जातात.
दोन वर्षात किती विवाह?
सरकारने पुढाकार घेत अनेक जिल्ह्यांमध्ये विवाहांना प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवले. या योजनांचा प्रचार केला. परंतु या योजनांना सुरुवात झाल्यापासून ऑगस्ट २०२२ ते ऑगस्ट २०२४ या कालखंडात देशभरात सुमारे ४२ जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे मॅचमेकिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
परंतु यातून केवळ २४ जोडप्यांनी विवाह केले आहेत. त्यामुळे हे प्रोत्साहन नागरिकांच्या फारसे पचनी पडलेले दिसत नाही.
सरकारकडून विवाहासाठी इतकी मोठी रक्कम देण्याची ऑफर दिली असताना जनमानसात याचा फारसा प्रभाव पडल्याचे दिसत नाही.