दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 10:27 IST2025-08-22T09:25:58+5:302025-08-22T10:27:32+5:30
दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळील ड्रेक पॅसेजजवळ ७.५ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला आहे.

दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
South America Earthquake: दक्षिण अमेरिकेतील ड्रेक पॅसेज प्रदेशात एक जोरदार भूकंप झाला. सुरुवातीला भूकंपाची तीव्रता ८ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती. नंतर यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने त्याची तीव्रता ७.५ इतकी असल्याची सांगितली. यामुळे लोकांना खूप जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा भूकंप दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका दरम्यान असलेल्या ड्रेक पॅसेजमध्ये १० किमी खोलीवर झाल्याचे सांगितले जात आहे. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे त्सुनामीचा इशारा देखील देण्यात आला आहे.
ड्रेक पॅसेज परिसरात मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले गेले. ड्रेक पॅसेज हा एक खोल आणि रुंद सागरी मार्ग आहे, जो नैऋत्य अटलांटिक महासागर आणि आग्नेय प्रशांत महासागराला जोडतो. यूएसजीएसच्या आकडेवारीनुसार, भूकंपाची नोंद १०.८ किलोमीटर खोलीवर झाली. यापूर्वी मे २०२५ मध्येही या भागात ७.५ तीव्रतेचा भूकंप झाला होता. अमेरिकेच्या राष्ट्रीय त्सुनामी केंद्राने प्यूर्टो रिको-व्हर्जिन बेटांवर त्सुनामीचा इशारा दिला आहे.
दरम्यान, पृथ्वीच्या आत सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत फिरत राहतात. जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात, एकमेकांवर घासतात चढतात किंवा त्यांच्यापासून दूर जातात तेव्हा जमीन हादरू लागते. याला भूकंप म्हणतात. भूकंप मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. ज्याला रिश्टर मॅग्निट्यूड स्केल म्हणतात. रिश्टर स्केल १ ते ९ पर्यंत असतो. भूकंपाची तीव्रता त्याच्या केंद्रावरून म्हणजेच केंद्रबिंदूवरून मोजली जाते. म्हणजेच, त्या केंद्रातून निघणारी ऊर्जा या स्केलवर मोजली जाते.