दक्षिण आफ्रिकेतील रस्ते सर्वात धोकादायक; भारतही या यादीत सामील, अहवालातून माहिती आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 15:36 IST2021-03-19T15:32:04+5:302021-03-19T15:36:03+5:30
Most Dangerous Roads for Drivers : दक्षिण आफ्रिकेत जगातील सर्वात धोकादायक रस्ते असल्याचं अभ्यासातून आलं समोर. पाहा भारत कोणत्या स्थानावर

दक्षिण आफ्रिकेतील रस्ते सर्वात धोकादायक; भारतही या यादीत सामील, अहवालातून माहिती आली समोर
जर तुम्ही दक्षिण आफ्रिकेतील रस्त्यांवर प्रवास करत असाल तर तुम्ही जगातील सर्वात धोकादायक रस्त्यांवर प्रवास करत आहात. इंटरनॅशनल ड्रायव्हर एज्युकेशन कंपनी Zutobi नं आपल्या एका रिसर्च स्टडीवरून क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत ५६ देशांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारतातील रस्तेही धोकादायक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या क्रमवारीत भारत हा चौथ्या स्थानावर आहे. धोकादायक रस्त्यांच्या यादीत थायलंड दुसऱ्या आणि युनायटेड किंगडम तिसऱ्या स्थानावर आहे.
या अहवालानुसार जर तुम्ही नॉर्वेमधील रस्त्यांवर प्रवास करत असाल तर तुम्ही सर्वात सुरक्षित रस्त्यावर प्रवास करत असल्याचं नमूद केलं आहे. सुरक्षित रस्त्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर जपान तर तिसऱ्या स्थानावर स्वीडन हे देश आहेत. Zutobi दिलेल्या माहितीनुसार त्यांनी प्रत्येक देशांमध्ये ५ गोष्टींच्या आधारावर हे विश्लेषण करण्यात आलं आहे. प्रत्येक फॅक्टर्ससाठी १० गुण ठरवण्यात आले होते. त्यानंतर या ५ फॅक्टर्सची सरासरी काढण्यात आली.
यामध्ये प्रति लाख लोकसंख्येच्या हिशोबानं रस्ते अपघातात होणारे मृत्यू सामील करण्यात आले आहेत. तसंच किती टक्के लोकं कार चालवताना सीट बेल्टचा वापर करतात. मद्यपान करून किती लोकांचा अपघातात मृत्यू झाला आहे अशा गोष्टींचा विचार अहवालात करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल हेल्थ ऑब्झरव्हेटरी आकडेवारीच्या आधारावर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. दरम्यान, या अहवालाला जस्टिस प्रोजेक्ट साऊथ आफ्रिका नावाच्या एका संघटनेनं आव्हान दिलं आहे. हा एक एनजीओ असून रोड ट्रॅफिकच्या कायद्यात सुधारणेवर काम करत आहेत. दक्षिण आफ्रिकेतील खराब ड्रायव्हिंग स्थितीशी आपण सहमत आहोत. परंतु या अभ्यासाठी Zutobi नं जुनी आकडेवारी घेतल्याची प्रतिक्रिया जस्टिस प्रोजेक्ट साऊथ आफ्रिकाचे चेअरपर्सनं हॉवर्ड डेम्बोवस्की यांनी दिली. तसंच दक्षिण आफ्रिका हाच एकमेव आफ्रिकन देश का आहे, असा सवालही त्यांनी केला.