"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:42 IST2025-12-23T12:41:30+5:302025-12-23T12:42:02+5:30
काही दिवसांपूर्वी जनरल आसिम मुनीर यांनी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानला 'दैवी शक्ती' मिळाल्याचा दावा केला होता.

"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या राजकारणात सध्या लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर आणि कट्टरपंथी नेते मौलाना फझलुर रहमान यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' (नंतर पाकिस्तानी लष्कराच्या झालेल्या नाचक्कीवरून मौलाना फझलुर रहमान यांनी लष्करप्रमुखांना आरसा दाखवला आहे. "एका हिंदूच्या समोर ९० हजार सैनिकांनी शरणागती पत्करली होती, हे विसरू नका," अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या इतिहासाची आठवण करून देत मुनीर यांच्यावर टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वी जनरल आसिम मुनीर यांनी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानला 'दैवी शक्ती' मिळाल्याचा दावा केला होता. यावर प्रत्युत्तर देताना मौलाना म्हणाले की, लष्करी नेतृत्व जनतेसमोर खोटी चित्रे उभी करत आहे. प्रत्यक्षात भारताच्या अचूक हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले आहे. "देशाची जनता आता सगळं जाणून आहे, त्यांना मूर्ख बनवणं थांबवा," असा इशारा त्यांनी दिला.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने मे २०२५ मध्ये 'ऑपरेशन सिंदूर' राबवले होते. यामध्ये भारतीय वायुसेना आणि लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. या कारवाईनंतर पाकिस्तानचे लष्कर बॅकफूटवर गेले असून, देशांतर्गत विरोधकांना उत्तर देताना त्यांची दमछाक होत आहे. यावरून मौलाना यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर यांना चांगलेच सुनावले आहे. तुम्ही पाकिस्तानविरोधी दहशतवादी लपल्याचे सांगत अफगाणिस्तान, इराणवर हल्ले केले मग भारताने केलेले ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते, अशा शब्दांत मौलानांनी मुनीर यांची बोलती बंद केली आहे. भारतही तेच सांगतोय काश्मीरवर हल्ले करणारे दहशतवादी इथे लपले होते, असे मौलाना म्हणाले.
अंतर्गत कलह वाढला मौलाना फझलुर रहमान यांनी केवळ युद्धावरूनच नव्हे, तर पाकिस्तानच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीसाठी देखील लष्कराच्या हस्तक्षेपाला जबाबदार धरले आहे. लष्कराने सत्तेत हस्तक्षेप केल्यामुळेच आज पाकिस्तानवर ही वेळ आली आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.