वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:02 IST2025-12-19T12:01:43+5:302025-12-19T12:02:42+5:30
Saudi Arabia Snowfall : सौदी अरेबियाच्या तबुक आणि ट्रोजेना भागात १८ डिसेंबर २०२५ रोजी मोठी बर्फवृष्टी झाली. तापमान उणे ४ अंशांवर गेले असून वाळवंट बर्फाच्छादित झाले आहे. वाचा सविस्तर वृत्त.

वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
सौदी अरेबिया म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते अथांग पसरलेले वाळवंट आणि कडक ऊन. मात्र, १८ डिसेंबर २०२५ रोजी या वाळवंटी देशाने सर्वांनाच थक्क केले आहे. सौदीतील तबुक प्रदेश आणि ट्रोजेना पर्वतरांगांमध्ये भीषण बर्फवृष्टी झाली असून, संपूर्ण परिसर बर्फाने पांढरा शुभ्र झाला आहे. येथील तापमान शून्याच्याही खाली म्हणजे उणे ४ अंश सेल्सिअसवर (-4°C) पोहोचले आहे.
उत्तर सौदीतील तबुक प्रांतातील जबल अल-लावज म्हणजेच 'बदामाचा पर्वत' हा परिसर या बर्फवृष्टीचे मुख्य केंद्र ठरला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे २,५८० मीटर उंचीवर असलेल्या या डोंगराळ भागात इतका बर्फ पडला आहे की, तिथल्या खडकाळ दऱ्या आणि वाळूचे डोंगर एखाद्या युरोपीय देशासारखे दिसू लागले आहेत. ट्रोजेना हायलँड्समध्येही मध्यम स्वरूपाच्या पावसासह बर्फवृष्टी झाल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
काय आहे या बर्फवृष्टीचे कारण?
सौदी अरेबियाच्या नॅशनल सेंटर फॉर मेटिओरोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूमध्य समुद्राकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे हे दुर्मिळ हवामान बदल पाहायला मिळत आहेत. केवळ तबुकच नाही, तर आगामी २४ तासांत रियाध आणि अल-कासिम यांसारख्या भागांतही थंडीची लाट आणि हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पर्यटकांची झुंबड आणि खबरदारीचा इशारा
वाळवंटात पडलेला बर्फ पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. लोक बर्फात खेळतानाचे आणि उंटांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. मात्र, कडाक्याची थंडी आणि धुक्यामुळे वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे. विजन २०३० अंतर्गत विकसित होत असलेल्या ट्रोजेना या पर्यटन स्थळासाठी ही बर्फवृष्टी मोठी पर्वणीच मानली जात आहे.