Snow and Ice Storm in USA: हिमवादळाने हाहाकार, ११ हजार विमाने रद्द, अमेरिकेत सहा लाख घरांतील वीज गुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:18 IST2026-02-26T12:16:31+5:302026-02-26T12:18:33+5:30
हिमवादळाने लोकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आठ राज्यांत एक फुटांपेक्षा जास्त बर्फवृष्टी झाली.

Snow and Ice Storm in USA: हिमवादळाने हाहाकार, ११ हजार विमाने रद्द, अमेरिकेत सहा लाख घरांतील वीज गुल
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ईशान्य भागात हिमवादळाने हाहाकार माजवला आहे. यामुळे ११ हजारांवर विमाने रद्द करण्यात आली असून, शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सहा लाख घरांतील वीज गुल झाली आहे. अनेक ठिकाणी विक्रमी बर्फवृष्टी झाली असून, प्रोविडन्स रोड आयलँडमध्ये तब्बल ३२.८ इंच बर्फवृष्टी झाली आहे.
हिमवादळाने लोकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आठ राज्यांत एक फुटांपेक्षा जास्त बर्फवृष्टी झाली. ईशान्येत याचा परिणाम अनेक दिवस राहू शकतो. मॅसाचुसेट्सच्या काही भागांत चालकांना वाहनांसह रस्त्यांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे.
१९७८चा विक्रम मोडला
मॅनहटनच्या सेंट्रल पार्कमध्ये २० इंच बर्फवृष्टी झाली. लाँग आयलँडच्या इस्लिपमध्ये २२ इंच बर्फ पडला. ३२.८ इंच बर्फ पडलेल्या प्रोविडन्स रोड आयलँडमध्ये यापूर्वीचा १९७८ मधील २८.६ इंच बर्फाचा विक्रम मोडला.
वेगवान वाऱ्याने जॉन एफ केनेडी विमानतळावर अनेक 3 अडचणी येत आहेत. तेथे हवेचा वेग ४७ मैल प्रति तास झाला आहे. मॅसाचुसेट्सच्या नानटकेट व मार्थाज वाइनयार्ड द्वीपांवर हवेचा वेग ७० मैल प्रति तास होता.