गणितीय ऑलिंपियाडमध्ये सहा पदकांची कमाई; ऑस्ट्रेलियातील सनशाइन कोस्ट येथे पार पडली स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 09:36 IST2025-07-21T09:36:00+5:302025-07-21T09:36:38+5:30
या स्पर्धेत सहभागी झालेल्या ११० देशांमध्ये यंदा भारताने सातवा क्रमांक पटकाविला. मागील सलग तीन वर्षांपासून भारतीय संघाने पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे.

गणितीय ऑलिंपियाडमध्ये सहा पदकांची कमाई; ऑस्ट्रेलियातील सनशाइन कोस्ट येथे पार पडली स्पर्धा
मुंबई : ऑस्ट्रेलियातील सनशाइन कोस्ट येथे नुकत्याच झालेल्या ६६व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाडमध्ये (आयएमओ) भारतीय संघाने दमदार कामगिरी करत तीन सुवर्ण आणि दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली. त्यामध्ये राज्यातील आदित्य मांगुडी याच्यासह दिल्लीच्या कनव तलवार, आरव गुप्ता यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. तर कर्नाटकच्या अबेल मॅथ्यू, दिल्लीचा आदिश जैन यांनी रौप्य आणि दिल्लीच्या अर्चित मानस याने कांस्यपदकाची कमाई केली.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या ११० देशांमध्ये यंदा भारताने सातवा क्रमांक पटकाविला. मागील सलग तीन वर्षांपासून भारतीय संघाने पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे. जगभरातील विविध देशांतील ६३० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात ६९ महिला होत्या.
गेल्यावर्षी २०२४ मध्ये भारताने ६५ व्या आयएमओमध्ये ४ सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला होता. भारताने १९८९ पासून आतापर्यंत २३ सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यातील ९ पदके ही गेल्या तीन आयएमओमध्ये जिंकली आहेत. तसेच १९९८ नंतर ऑलिम्पियाडमध्ये एकाचवेळी ३ सुवर्णपदके जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. यावर्षी भारतीय संघाने स्पर्धेत २५२ पैकी १९३ गुण मिळवून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.
होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन हे गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील विविध आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि निवडण्यासाठी नोडल सेंटर आहे.
ऑलिम्पियाडमध्ये चार विषयांवरून प्रश्न
गणितीय ऑलिम्पियाडमध्ये चार व्यापक विषयांवरून प्रश्न विचारले जातात. त्यात बीजगणित, संयोजनशास्त्र, संख्या सिद्धांत, भूमिती आणि यजमान देश प्रत्येक सहभागी देशाकडून समस्या प्रस्ताव मागतो. कोणत्याही सहभागी देशाकडून सहा प्रश्न सादर केले जाऊ शकतात.