देशातील परिस्थिती सावरेना, मध्यस्थीची हौस फिटेना; शांतता दूत पाकिस्तानात लॉकडाऊन? ड्राफ्ट लीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 09:59 IST2026-03-30T09:57:27+5:302026-03-30T09:59:31+5:30
Smart Lockdown In Pakistan: पाकिस्तानात तीव्र इंधन टंचाई असून, लॉकडाऊन लागल्यानंतर विवाह समारंभांपासून ते शहरे, महामार्ग बंद ठेवण्यापर्यंत वेळ येऊ शकते, असे म्हटले जात आहे.

देशातील परिस्थिती सावरेना, मध्यस्थीची हौस फिटेना; शांतता दूत पाकिस्तानात लॉकडाऊन? ड्राफ्ट लीक
Lockdown In Pakistan:पाकिस्तान एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थी करण्याचे प्रयत्न करत आहे. दोन्ही देशांनी इच्छा व्यक्त केल्यास चर्चेसाठी यजमानपद भूषवण्याची तयारीही पाकिस्तानने दर्शवली आहे. मात्र, पाकिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होताना पाहायला मिळत आहे.
अमेरिका इस्रायल इराण युद्धामध्ये शांतता दूत मध्यस्थ म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तानातील परिस्थिती इतकी गंभीर आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे 'स्मार्ट लॉकडाऊन' लावण्याबाबत पाकिस्तानचे सरकार विचार करत आहे. त्याबाबत चर्चाही सुरू झाली असून, याच संदर्भातील एक ड्राफ्ट लीक झाल्याचे सांगितले जात आहे.
मसुद्याची प्रत अंतिम आदेश म्हणून प्रसिद्ध
या लीक ड्राफ्टनुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत देशभरात दोन दिवसांचा स्मार्ट लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो. पाकिस्तानी सरकारने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, स्मार्ट लॉकडाउनचा अंतिम आदेश अद्याप पारित झालेला नाही आणि पाकिस्तानी माध्यमांनी मसुद्याची प्रत अंतिम आदेश म्हणून प्रसिद्ध करणे चुकीचे आहे. पाकिस्तानी सरकारने राज्यांना पाठवलेल्या स्मार्ट लॉकडाऊनच्या मसुद्यानुसार, जर सर्व पक्षांनी सहमती दर्शवली, तर पुढील सूचना मिळेपर्यंत संपूर्ण पाकिस्तानात स्मार्ट लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो.
मोटरवे, शहरी रस्ते आणि महामार्गही बंद करण्याचा विचार
पाकिस्तानमधील परिस्थिती किती बिकट झाली आहे याचा अंदाज यावरून येतो की, एका प्रस्तावानुसार, पाकिस्तानी सरकार 'स्मार्ट लॉकडाऊन' दरम्यान संपूर्ण पाकिस्तानमधील मोटरवे, शहरी रस्ते आणि महामार्गही बंद करण्याचा विचार करत आहे. जर कोणाला एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा शहरांतर्गत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा असेल, तर त्यांना स्वतःच्या खाजगी वाहनाचा वापर करता येणार नाही आणि सरकारी बसने प्रवास करावा लागेल.
पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट होण्याचे हे लक्षण
पाकिस्तान डिझेल आणि पेट्रोल टंचाई तीव्र झाली आहे. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे आवश्यक तेल खरेदी करणे शक्य होत नाही. पाकिस्तानचा दावा आहे की, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आपला ध्वज असलेल्या २० जहाजांना जाण्याची परवानगी देण्याचे मान्य केले आहे. पाकिस्तानी ध्वज असलेली दोन जहाजे दररोज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ शकतील. पण असेही वृत्त आहे की, ही जहाजे अमेरिकेकडे जाणारी असतील. इराणसोबत सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल युद्धात पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत असला, तरी परिस्थिती सुधारण्याऐवजी पाकिस्तानात स्मार्ट लॉकडाऊनवर चर्चा सुरू आहे. पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट होण्याचे हे लक्षण असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, स्मार्ट लॉकडाऊन लागू झाल्यावर पाकमधील बाजारपेठा, व्यावसायिक आस्थापने, कार्यालये आणि दुकाने पूर्णपणे बंद राहतील. स्मार्ट लॉकडाऊन दरम्यान पाकिस्तानात विवाह समारंभांसह सर्व प्रकारचे उत्सव बंद राहतील. पाकिस्तानी सरकार ४ एप्रिलपासून हा स्मार्ट लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करत आहे.