'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:58 IST2025-07-28T18:45:16+5:302025-07-28T18:58:38+5:30
ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी पाश्चात्य देशांवर दुहेरी निकष लावल्याचा आरोप केला.

'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी रशियासोबत व्यवसाय करणाऱ्या देशांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती. त्यांचे थेट लक्ष्य भारत होते. आता भारताने पाश्चात्य देशांना कडक प्रत्युत्तर दिले आहे. "भू-राजकीय उलथापालथीमुळे भारत आपली अर्थव्यवस्था बंद करू शकत नाही", असं भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी म्हणाले.
एका मुलाखतीमध्ये भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, "रशियाशी असलेले संबंध फक्त तेलापुरते मर्यादित नाहीत. ते जुन्या आणि खोल सुरक्षा सहकार्यावर आधारित आहे. एक काळ असा होता जेव्हा पाश्चात्य देश आपल्याला शस्त्रे विकण्यास तयार नव्हते. परंतु ते आपल्या शेजारील देशांना तीच शस्त्रे देत होते जी आपल्याविरुद्ध वापरली जात होती."
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
दोराईस्वामी म्हणाले की, अनेक युरोपीय देश अजूनही त्याच देशांकडून दुर्मिळ खनिजे आणि ऊर्जा उत्पादने खरेदी करत आहेत ज्या देशांकडून ते भारताकडून खरेदी करण्यास नकार देत आहेत. त्यांची प्रतिक्रिया मुख्यत्वे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेशी सुसंगत आहे, हे अनेकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताच्या तेल आयातीचे समर्थन करतात.
गेल्या वर्षी, जयशंकर यांनी युरोपला त्यांच्या निवडक दृष्टिकोन बद्दल फटकारले होते. 'युरोपने रशियासोबतचा व्यापार थांबवला नाही, म्हणून भारत फक्त युरोपला खूश करण्यासाठी जास्त पैसे देणार नाही', असंही त्यांनी म्हटले होते.
रशियाकडून तेल घेणारा भारत सर्वात मोठा देश
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल निर्यातदार आणि ग्राहक देश आहे. तीन वर्षांपूर्वी जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले तेव्हा रशियाने स्वस्त दरात तेल विकण्यास सुरुवात केली.
भारताने या संधीचा फायदा घेतला आणि रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करण्यास सुरुवात केली. आज भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणारा सर्वात मोठा भारत देश बनला आहे. अमेरिकेसह पश्चिमेकडील देशांना हे आवडत नाही.
१६ जुलै रोजी नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांनी ब्राझील, चीन आणि भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याविरुद्ध कडक इशारा दिला. रुट म्हणाले की, जर हे देश रशियासोबत व्यापार करत राहिले तर त्यांना मोठ्या निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते.
यानंतर २२ जुलै रोजी अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी 'राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाकडून तेल आयात करणाऱ्या देशांवर मोठ्या प्रमाणात कर लादतील', असा इशारा दिला होता. 'त्यांनी विशेषतः भारत, चीन आणि ब्राझीलचे नाव घेतले.