'मला गोळ्या घाला आणि इथेच जमिनीत पुरा'; शेख हसीना लष्करी अधिकाऱ्याला असं का बोलल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:39 IST2025-05-28T14:37:00+5:302025-05-28T14:39:01+5:30
बांगलादेशात विद्यार्थ्यांचे आंदोलन हिंसक झाल्यानंतर पंतप्रधानपद सोडून शेख हसीना यांना देश सोडावा लागला. बांगलादेशातून फरार होण्यापूर्वी त्यांचं एका लष्करी अधिकाऱ्यासोबत बोलणं झालं होतं. गणभवनात त्यादिवशी काय घडलं होतं?

'मला गोळ्या घाला आणि इथेच जमिनीत पुरा'; शेख हसीना लष्करी अधिकाऱ्याला असं का बोलल्या?
"मला गोळ्या घाला आणि इथेच गणभवनामध्ये दफन करा." हे विधान आहे शेख हसीना यांचे. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांचं सरकार विद्यार्थी आंदोलकांनी उलथवून टाकले. त्यांना आपला देश सोडावा लागला. बांगलादेशातून फरार होण्यापूर्वी गणभवनात त्यांनी हे विधान केले होते. त्या असं का बोलल्या होत्या, याबद्दल आता आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादासमोर सुनावणी सुरू असताना खुलासा झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि सध्या भारतात आश्रयाला असलेल्या शेख हसीना यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरोधातील गुन्हेगारी प्रकरणे आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादासमोर आहे. या सुनावणीत मुख्य वकील मोहम्मद ताजूल इस्लाम यांनी ही माहिती माहिती.
शेख हसीना ज्या दिवशी देशातून फरार झाल्या, त्यावेळी शेवटच्या तासाभरात काय घडले याबद्दल माहिती दिली.
गणभवन हे बांगलादेशच्या पंतप्रधानांचे शासकीय निवासस्थान आहे. त्याच निवासस्थानात शेख हसीना लष्करी अधिकाऱ्याला मला गोळ्या घाला आणि इथेच गणभवनामध्ये पुरा असे म्हणाल्या होत्या.
शेख हसीनांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यास दिला होता नकार
मोहम्मद ताजूल इस्लाम यांनी सांगितले की, 'बांगलादेशच्या संसदेचे अध्यक्ष शिरीन शर्मिन चौधरी हे सर्वात आधी शेख हसीना यांना पदावरून पायउतार व्हा, असे म्हणाले होते. त्यावेळी सत्ताधारी असलेल्या अवामी लीगच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता.'
पंतप्रधानांच्या निवासस्थानी मध्यरात्री झाली होती बैठक
'४ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यरात्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत शाब्दिक चकमक उडाली. या बैठकीत मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री आणि सुरक्षा दलाचे प्रमुखही होते. सुरक्षा सल्लागार मेजर जनरल (निवृत्त) तारीक अहमद सिद्दिकी यांनी शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा, असा सल्ला दिला. त्यावर शेख हसीना रागावला आणि राजीनामा देण्यास नकार दिला. त्यांनी लष्करप्रमुखांना आंदोलन चिरडून टाका असे निर्देश दिले', असे इस्लाम यांनी सांगितले.
५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत काय घडलं होतं?
'त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना यांच्यासोबत लष्करी आणि पोलीस अधिकाऱ्यांची आणखी एक बैठक झाली. आंदोलन नियंत्रणाबाहेर गेलं असल्यासंदर्भात ही बैठक होती. पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलन नियंत्रणात आणण्यात असमर्थ असल्याचे सांगितले. त्यानंतर लष्करी अधिकाऱ्याने पुन्हा शेख हसीना यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला. त्यावर शेख हसीना रागाने लालबुंद झाल्या आणि 'मग मला गोळ्या घाला आणि इथेच गणभवनामध्ये मला दफन करा' असे म्हणाल्या', अशी माहिती इस्लाम यांनी दिली.