बांग्लादेशात राजकीय भूकंप! शेख हसीना यांना फाशीची शिक्षा ठोठावली जाणार? 17 नोव्हेंबरला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:59 IST2025-11-13T17:57:43+5:302025-11-13T17:59:06+5:30
Sheikh Hasina Bangladesh: शेख हसीना यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयातील खटल्याला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे.

बांग्लादेशात राजकीय भूकंप! शेख हसीना यांना फाशीची शिक्षा ठोठावली जाणार? 17 नोव्हेंबरला निकाल
Sheikh Hasina Bangladesh: शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांग्लादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले. मात्र, अद्याप देशातील परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. अशातच, सरकारने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्ध गुन्ह्यांच्या आरोपांत फाशीची शिक्षा सुनावण्याची तयारी केली आहे. देशातील ‘आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने’ गुरुवारी घोषणा केली की, या प्रकरणाचा अंतिम निकाल 17 नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे.
आवामी लीगने दिला ढाका बंदची हाक
या घोषणेनंतर ढाकामध्ये तणावाचे वातावरण आहे. माजी पंतप्रधानांचा पक्ष असलेल्या आवामी लीगने ‘ढाका बंद’चे आवाहन केले आहे. न्यायाधिकरणात उपस्थित पत्रकारांच्या माहितीनुसार, तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निकालासाठी तारीख ठरवली असून, ढाक्यात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
या खटल्यात शेख हसीनांसह माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल आणि तत्कालीन पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांच्यावरही आरोप आहेत. हसीना आणि कमाल, दोघांनाही ‘फरार आरोपी’ घोषित करण्यात आले आहे. मुख्य सरकारी वकील मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी तिन्ही आरोपींना मृत्युदंड देण्याची मागणी केली आहे.
मात्र, माजी पोलीसप्रमुख मामून यांनी सुरुवातीला स्वतः उपस्थित राहून खटल्याचा सामना केला, परंतु नंतर सरकारी साक्षीदार बनले. 28 दिवस चाललेल्या सुनावणीत 54 साक्षीदारांनी साक्ष दिली. त्यांनी2024 च्या ‘विद्यार्थी आंदोलना’दरम्यान सरकारने केलेल्या दडपशाहीचा तपशील मांडला.
विद्यार्थी आंदोलनाने कोसळले हसीना सरकार
5 ऑगस्ट 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर हसीनांचे आवामी लीग सरकार सत्तेवरून पायउतार झाले होते. सरकारवर आंदोलकांची हत्या, हत्येचा प्रयत्न, छळ व अमानवीय कृत्ये यांसारखे आरोप ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ढाक्यात सैन्य, अर्धसैनिक दल आणि दंगलनियंत्रक पोलिस तैनात आहेत. शहरात कर्फ्यूसदृश परिस्थिती असून रस्ते ओस पडले आहेत.
हे कंगारू कोर्ट; हसीनांचा मोठा आरोप
निकालाच्या काही दिवस आधीच शेख हसीनांनी मोठे विधान केले. त्यांनी न्यायाधिकरणाला कंगारू कोर्ट म्हटले आणि दावा केला की, हे न्यायालय त्यांच्या राजकीय शत्रूंच्या नियंत्रणाखाली आहे. मी आंतरराष्ट्रीय निरीक्षणाखाली, अगदी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात (ICC) सुद्धा खटल्याला सामोरे जाण्यास तयार आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच, जर सरकारचे माझ्यावरील आरोप इतके खात्रीशीर असतील, तर त्यांनी माझ्यावर ICC मध्ये खटला चालवावा. पण ते तसे करत नाहीत, कारण ICC हे निष्पक्ष न्यायालय आहे आणि तिथे मला नक्कीच निर्दोष ठरवले जाईल, असेही ते म्हणाले.