पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 20:45 IST2025-12-12T20:36:03+5:302025-12-12T20:45:37+5:30
आंतरराष्ट्रीय मंचवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची नामुष्की! पुतिन यांनी ४० मिनिटे ताटकळत ठेवले

पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
Shehbaz Sharif Meet Vladimir Putin: शांतता आणि तटस्थतेच्या आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यामुळे अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागला. नियोजित भेटीसाठी पुतिन यांनी शहबाज शरीफ यांना तब्बल ४० मिनिटांहून अधिक काळ वाट पाहायला लावली. या सगळ्या प्रकारामुळे
शहबाज शरीफ यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर खिल्ली उडवली जात आहे. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर शरीफ जबरदस्तीने बैठकीत सहभागी झाले.
तुर्कमेनिस्तान येथे आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल फोरम ऑन पीस अँड ट्रस्ट कार्यक्रमात ही घटना घडली. रशियन टुडेने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये शहबाज शरीफ त्यांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री इशाक डार यांच्यासह एका खोलीत पुतिन यांची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. ४० मिनिटे होऊनही पुतिन न आल्याने शरीफ बेचैन झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
बराच वेळ ताटकळल्यानंतर शरीफ यांनी अचानक उठून, बाजूच्या कक्षात सुरू असलेल्या पुतिन आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगान यांच्या बंद खोलीतील बैठकीत जबरदस्तीने प्रवेश केला. मात्र, तिथेही त्यांची पुतिन यांच्याशी सविस्तर चर्चा होऊ शकली नाही आणि अवघ्या दहा मिनिटांत त्यांना तिथून बाहेर पडावे लागले.
❗️The Moment PM Sharif Gate-crashed Putin's Meeting With Erdogan After Waiting For 40 Mins https://t.co/r4L9XhA9IYpic.twitter.com/shi7YLMgmP
— RT_India (@RT_India_news) December 12, 2025
शहबाज शरीफ यांची उडवली खिल्ली
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि शहबाज शरीफ यांची नेटकऱ्यांकडून जोरदार खिल्ली उडवली जात आहे. "भिकाऱ्यांवर पुतिन आपला वेळ वाया घालवू इच्छित नाही," अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. काहींनी या घटनेला आंतरराष्ट्रीय बेइज्जती म्हटले आहे. आणखी एका युजरने त्यांची तुलना लग्नात आमंत्रणाशिवाय घुसलेल्या पाहुण्याशी केली.
भारत दौऱ्याची चर्चा
ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. भारतात त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम विमानतळावर प्रोटोकॉल मोडून अत्यंत उत्साहाने आणि उबदार स्वागत केले होते. पंतप्रधान मोदी आणि पुतिन एकाच गाडीतून पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले होते. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना पुतिन यांनी ताटकळत ठेवल्याच्या घटनेने भारत आणि पाकिस्तान यांच्याशी असलेल्या रशियाच्या संबंधांतील मोठा फरक समोर आला आहे.
दरम्यान, शहबाज शरीफ आणि व्लादिमीर पुतिन यांची थोडक्यात भेट झाली, पण या ४० मिनिटांच्या प्रतीक्षेमुळे शरीफ यांना झालेला आंतरराष्ट्रीय अपमान चर्चेचा विषय बनला आहे.