मेघालयमार्गे भारतात घुसले शरीफ उस्मान हादी मारेकरी; ढाका पोलिसांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 17:53 IST2025-12-28T17:42:34+5:302025-12-28T17:53:35+5:30
शरीफ उस्मान हादी हत्या प्रकरणात ढाका पोलिसांनी खळबळजनक दावा केला आहे.

मेघालयमार्गे भारतात घुसले शरीफ उस्मान हादी मारेकरी; ढाका पोलिसांचा खळबळजनक दावा
Sharif Usman Hadi Murder Case:बांगलादेशातील सत्तांतरानंतरचे प्रमुख चेहरा आणि इन्कलाब मंचचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येचे धागेदोरे आता भारतापर्यंत पोहोचले असल्याचा दावा ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांनी केला आहे. हादी यांच्या हत्येतील दोन मुख्य संशयित आरोपी मयमनसिंह सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाले असून ते सध्या मेघालयात लपले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
मेघालयातील तुरा शहरात आरोपींचे वास्तव्य
अतिरिक्त आयुक्त एस. एन. नजरुल इस्लाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, फैसल करीम मसूद आणि आलमगीर शेख हे दोन मुख्य आरोपी स्थानिक हस्तकांच्या मदतीने हलुआघाट सीमेवरून भारतात पळाले आहेत. सीमेपलीकडे त्यांना पुर्ती नावाच्या व्यक्तीने रिसिव्ह केले आणि समी नावाच्या टॅक्सी ड्रायव्हरने त्यांना मेघालय राज्यातील तुरा शहरात पोहोचवले. महत्त्वाचे म्हणजे, या आरोपींना मदत करणाऱ्या दोन व्यक्तींना भारतीय सुरक्षा दलांनी ताब्यात घेतल्याची अनौपचारिक माहिती बांगलादेश पोलिसांना मिळाली आहे. मात्र, अद्याप भारत सरकारकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
प्रत्यर्पणासाठी बांगलादेशचे प्रयत्न
"आम्ही अधिकृत आणि अनौपचारिक अशा दोन्ही माध्यमातून भारत सरकारशी संपर्क साधून आहोत. या दोन्ही मुख्य आरोपींना अटक करून त्यांचे प्रत्यर्पण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत," असे नजरुल इस्लाम यांनी स्पष्ट केले. बांगलादेशातील अंतरिम सरकारवर या हत्येचा छडा लावण्याचा मोठा दबाव आहे.
कोण होते शरीफ उस्मान हादी?
३२ वर्षीय शरीफ उस्मान हादी हे गेल्या वर्षी शेख हसीना सरकार उलथवून लावणाऱ्या विद्रोहाचे प्रमुख नेते होते. ते भारत आणि अवामी लीगचे कट्टर टीकाकार म्हणून ओळखले जात होते. फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकीसाठी ते ढाका-८ मतदारसंघातून तयारी करत होते. मात्र, १२ डिसेंबर रोजी निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान १८ डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला.
हत्येनंतर बांगलादेशात हिंसाचाराचा भडका
हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात प्रचंड अराजकता पसरली आहे. आंदोलकांनी प्रथम आलो आणि द डेली स्टार सारख्या नामांकित वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ले करून आगजनी केली. छायानाट आणि उदिची शिल्पी गोष्ठी यांसारख्या सांस्कृतिक केंद्रांत तोडफोड करण्यात आली. मयमनसिंह येथे एका हिंदू फॅक्टरी कामगाराची जमावाने निर्घृण हत्या केल्याने तणाव अधिकच वाढला आहे.