जमीन फाटली अन् रस्ता गिळला! शांघाईमध्ये मेट्रोच्या कामामुळे महाकाय खड्डा, थरारक व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:19 IST2026-02-12T17:15:07+5:302026-02-12T17:19:35+5:30

चीनमध्ये मेट्रोच्या कामामुळे रस्त्याला मोठा खड्डा पडल्याची घटना समोर आली आहे.

Shanghai Shocker Massive Sinkhole Swallows Busy Road Intersection Dramatic CCTV Footage Goes Viral | जमीन फाटली अन् रस्ता गिळला! शांघाईमध्ये मेट्रोच्या कामामुळे महाकाय खड्डा, थरारक व्हिडिओ व्हायरल

जमीन फाटली अन् रस्ता गिळला! शांघाईमध्ये मेट्रोच्या कामामुळे महाकाय खड्डा, थरारक व्हिडिओ व्हायरल

China Road Collapse:चीनची आर्थिक राजधानी असलेल्या शांघाई शहरात बुधवारी एक भयावह घटना घडली. शहराच्या मिनहांग जिल्ह्यातील एका गजबजलेल्या चौकातील रस्ता अचानक खचला आणि तिथे एका महाकाय मोठा खड्डा तयार झाला. भुयारी रेल्वेच्या कामादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिनहांग जिल्ह्यातील किक्सिन रोड आणि लियान रोडच्या जंक्शनवर ही घटना घडली. या ठिकाणी जियामिन मेट्रो लाईनसाठी जमिनीखाली मोठे खोदकाम सुरू आहे. बुधवारी अचानक या मेट्रो स्टेशनच्या बांधकामाच्या ठिकाणी गळती झाली आणि त्यामुळे रस्त्याचा एक मोठा भाग बघता बघता जमिनीच्या पोटात गडप झाला. रस्ता खचताना आसपासच्या काही गोष्टीही त्या खड्ड्यात कोसळल्या.

कोणीही जीवितहानी नाही

सुदैवाने, ज्या वेळी हा रस्ता खचला, त्या क्षणी तिथे कोणतेही वाहन किंवा पादचारी नव्हते. स्थानिक प्रशासनाने सांगितले की, या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही किंवा कोणीही जखमी झालेले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी किक्सिन रोड आणि लियान रोडचा परिसर वाहतुकीसाठी बंद केला आहे.

शांघाईची जमीन धोकादायक?

शांघाईमध्ये अशा प्रकारे जमीन खचण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. तज्ज्ञांच्या मते यामागे अनेक नैसर्गिक आणि मानवी कारणे आहेत. शांघाईची जमीन ही नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाची बनलेली आहे, जी खूप मऊ असते. जमिनीखालच्या पाण्याचा अतिवापर केल्यामुळे जमिनीच्या खाली पोकळी निर्माण झाली आहे. २०१७ ते २०२३ दरम्यान चीनमध्ये झालेल्या ७२ टक्के अशा घटनांमागे मानवी उपक्रम, निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि पाईपलाईनमधील बिघाड ही प्रमुख कारणे आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, जानेवारी २०२४ मध्येही याच मिनहांग जिल्ह्यात सीवेज पाईप फुटल्यामुळे रस्ता १० मीटर खोल खचला होता. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे शांघाईसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरांमधील नागरी नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

Web Title : शंघाई में सड़क धँसी: मेट्रो कार्य से विशाल गड्ढा, वीडियो वायरल

Web Summary : शंघाई के मिनहांग जिले में मेट्रो निर्माण के दौरान सड़क धंस गई, जिससे एक विशाल गड्ढा बन गया। सौभाग्य से, कोई घायल नहीं हुआ। इस घटना ने तेजी से बढ़ते शहर में जमीन की स्थिरता और बुनियादी ढांचे की सुरक्षा को लेकर चिंताएं बढ़ा दी हैं, हाल ही में इसी तरह की घटनाएं हुई हैं।

Web Title : Shanghai Road Collapse: Metro Work Creates Giant Sinkhole, Video Viral

Web Summary : A road in Shanghai's Minhang district collapsed during metro construction, creating a massive sinkhole. Fortunately, no injuries were reported. The incident raises concerns about ground stability and infrastructure safety in the rapidly growing city, with similar incidents occurring recently.