अमेरिकेच्या फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशनचे माजी अधिकारी जोनाथन बुमा यांनी उद्योगपती आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांच्याविषयी मोठा दावा केला आहे. रशियाची गुप्तचर यंत्रणा मस्क यांना सेक्स आणि ड्रग्सच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणार होती. मस्क यांना अडकवण्यासाठी रशियाने कट रचला होता असा दावा एफबीआयच्या माजी अधिकाऱ्याने केला आहे.
जोनाथन बुमा म्हणाले की, रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी या प्लॅनला मंजुरी दिली होती. युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी मस्क आणि पेपालचे सहसंस्थापक पीटर थिएल रशियाच्या गुप्तहेरांच्या नजरेत होते. आवश्यकता भासल्यास त्यांच्याविरोधात ब्लॅकमेलिंगसाठी सीक्रेट माहिती जमा केली होती असं त्यांनी म्हटलं. बुमा यांनी जर्मन ब्रॉडकास्टर झीडीएफद्वारे प्रसारिक एका डॉक्युमेंट्रीत हा दावा केला आहे.
ब्लॅकमेलचा मास्टरप्लॅन
रशियाची गुप्तचर यंत्रणा एलन मस्क यांची खासगी छंद आणि सवयीचा फायदा उचलू इच्छित होती. मस्क यांचे महिलांशी अनैतिक संबंध, ड्रग्स खासकरून केटामाइनची सवय याकडे रशियाचे गुप्तहेर संधी म्हणून पाहत होते. या माध्यमातून मस्क यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्लॅन होता.
काय होता हेतू?
मस्क आणि पेपालचे सहसंस्थापक पीटर थील यांना युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी रशियाचे गुप्तहेर टार्गेट बनवत होते. मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्याशी माहिती जमा केली होती जेणेकरून गरज भासल्यास त्यांना ब्लॅकमेल करता येईल. रशियाच्या राष्ट्रपतींना या पूर्ण योजनेची माहिती होती. पुतिन यांच्या परवानगीशिवाय एजेंट या कटात सहभागी होणार नाहीत असा दावाही बुमा यांनी केला. जोनाथन बुमा यांनी १६ वर्ष एफबीआयमध्ये काम केले आहे. मार्चमध्ये गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी बुमा यांना अटक झाली होती.
मस्क यांचं युक्रेन कनेक्शन काय?
युक्रेनबाबत मस्क यांची भूमिका चर्चेत होती. मस्क यांनी आधी युक्रेनी सैन्याला त्यांच्या स्टारलिंक इंटरनेट सेवा मोफत देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ही सेवा बंद करण्याची धमकी दिली होती. २०२४ मध्ये मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनी नेतृत्वावर जाहीर टीकाही केली होती. मागील आठवड्यात एलन मस्क ट्रम्प यांच्यासोबत मिडल ईस्ट दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी कतारचे अमीर आणि अन्य नेत्यांची भेट घेतली. अमेरिकेत मस्क यांची लोकप्रियता घटत आहे. त्यांची कंपनी टेस्ला आर्थिक संकटात सापडली आहे.